सोंड्याटोलातील गाळ उपसण्याची कामे अडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:00 AM2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:01:04+5:30
सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर असणाऱ्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात पावसाळापूर्वी ठिकठाक चित्र नाही. या प्रकल्प स्थळात पावसाळा पूर्वी करण्यात येणारी अनेक कामे प्रलंबित आहेत. यामुळे नदीपात्रातून पाणी उपसा करताना अडचणी येणार आहेत. प्रकल्पस्थळात नळपंपगृहांना पाणी पुरवठा करण्याकरिता नदीपाण्यात सम (टाकी)चे बांधकाम करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : महत्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पावसाळा पूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली नाही. पंपगृहाला पाणी पुरवठा करणाऱ्या सम मधील रेती आणि मातीचा उपसा करण्यात आला नसल्याने पंपगृहातून पाणी उपसा करताना अडचणी येणार आहे.
सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर असणाऱ्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात पावसाळापूर्वी ठिकठाक चित्र नाही. या प्रकल्प स्थळात पावसाळा पूर्वी करण्यात येणारी अनेक कामे प्रलंबित आहेत. यामुळे नदीपात्रातून पाणी उपसा करताना अडचणी येणार आहेत. प्रकल्पस्थळात नळपंपगृहांना पाणी पुरवठा करण्याकरिता नदीपाण्यात सम (टाकी)चे बांधकाम करण्यात आले आहे. या टाकीत नदीपात्रातून वाहणारे पाणी अडविले जात आहे. साठवणूक पाणी पंपगृहाचे सहाय्याने चांदपूर जलाशयात उपसा करण्यात येत आहे. परंतु पंपगृहाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत रेती आणि गाळ साचली आहे. या टाकीत समतल मैदान तयार झाले आहे. नदी पात्राचे समांतर माती, रेती, गाळ साचल्याने टाकीत पाणी साठवणूक करता येत नाही. गाळ उपसा करण्याचे वार्षिक नियोजन आहे. परंतु गेली अनेक वर्ष टाकीतील गाळ उपसा करण्यात आली नाही. यामुळे पावसाळ्यात नदी पात्रातून पाणी उपसा करताना पंपगृहात माती, रेती, लाकडे, गाळ शिरत आहे. यामुळे पंपगृहात वारंवार तांत्रिक बिघाड होत आहे.
पावसाळ्यात नऊ पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत नाही. पाच पंपगृह पाण्याचा उपसा करीत आहेत. संपूर्ण पंपगृह सुरु करण्यात येत नसल्याने जलद गतीने जलाशयात पाणी साठवणूक होत नाही. या प्रकल्पस्थळात निविदा अंतर्गत कामाचे कंत्राट देण्यात येत आहे. विद्युत, तांत्रिक व अन्य कामाचे कंत्राट देण्यात येत असले तरी टाकीतील गाळ उपसा कार्यक्रम फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत राबविण्यात येत नाही. टाकीत दरवर्षी गाळ जमा होत असताना गांभीर्याने उपसा करण्याचे प्रयत्न होत नाही. नदीपात्रात पावसाळा संपताच पाणी राहत नाही. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पस्थळातील समस्या निकाली काढण्याकरिता प्रयत्न करीत नाही.
टाकीतील गाळ प्रकारात आलबेल करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षात पंपगृहातून लाकडी ओंडके निघाली होती. या प्रकल्पस्थळात हस्तांतरण पाटबंधारे विभागाला झाले असल्याची माहिती मिळाली असली तरी या विभागाकडे फक्त नियंत्रण देण्यात आले आहे. निविदा अंतर्गत कामे उपलब्ध असणाऱ्या कंत्राटदारांना देयके गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजना तिरोडा कार्यालयातून देण्यात येत आहे.
नियंत्रणात एक ना धड भाराभर चिंध्या
पाटबंधारे विभागाला योजना हस्तांतरीत करण्यात येत असली तरी या विभागात फेरफटका मारण्याकरिता साधे कर्मचारी नाहीत. यामुळे त्यांची हस्तांतरण करिता मानसिकता नाही. दोन विभाग सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नियंत्रण ठेवत असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली असल्याने वर्षातील नऊ महिने कुणी अधिकारी प्रकल्प स्थळात ढुंकूनही पाहत नाही. आॅपरेटर आणि सुरक्षा गार्ड याची मात्र तैनाती ठेवण्यात येत आहे.
सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेत पाटबंधारे विभागाचे नियंत्रण असून तिरोडा कार्यालयातून निविदाधारकाचे देयक अदा करण् यात येत आहे.
-एस.एन. गेडाम, उपविभागीय अभियंता, उपसा सिंचन योजना