साकोलीत धुंवाँधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:55 AM2019-08-14T00:55:14+5:302019-08-14T00:55:52+5:30
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळपासूनच जिल्हाभरात पावसाला सुरूवात झाली. साकोली शहरात पाच तास धुव्वाधार पाऊस बरसल्याने अनेक वसाहती जलमय झाल्या. नागझिरा रोडवरील एकता कॉलोनीतील अनेकांच्या घरात पाणी शिरले. नाल्यांना पूर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/साकोली : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळपासूनच जिल्हाभरात पावसाला सुरूवात झाली. साकोली शहरात पाच तास धुव्वाधार पाऊस बरसल्याने अनेक वसाहती जलमय झाल्या. नागझिरा रोडवरील एकता कॉलोनीतील अनेकांच्या घरात पाणी शिरले. नाल्यांना पूर आला आहे. साकोलीत या पावसाने अनेकांची दाणादान झाली.
गत शनिवारपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे मंगळवारी सकाळपासून आगमन झाले. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत आहे. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात झाला. साकोली येथे दुपारी १ वाजता मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तब्बल पाच तास सारखा पाऊस बरसत होता. यावर्षीच्या पावसाळ्यातील सर्वात दमदार पाऊस मंगळवारी कोसळला. नागझिरा मार्गावरील एकता कॉलोनीतील अनेकांच्या घरात पाणी शिरले. जमनापूर जाणारा रस्ता नाल्याला आलेल्या पुरामुळे ठप्प झाला होता. शहरातील रस्त्यांवर गुढगाभर पाणी साचले होते. सायंकाळी ६ वाजतानंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिपरिप मात्र सुरू होती.
भंडारा शहरात दुपारी १२ वाजताच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरींना सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत सारखा पाऊस कोसळत होता. जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, लाखनी, लाखांदूर, पवनी या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ११.६ मीमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६५७ मीमी पाऊस बरसला आहे. तो सरासरीच्या ८१ टक्के आहे.
पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने उघडले
गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाची पातळी वाढत आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणासाठी पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने मंगळवारी सायंकाळी ६ वाजता उघडण्यात आले. या धरणाची आजची जलपातळी ३१८.९३ मीटर नोंदविण्यात आली आहे. पुजारीटोला प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यानंतर वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ होते.
गोसेखुर्द प्रकल्पाची शनिवारी जलपातळी २४३.२५० मीटर नोंदविण्यात आली आहे. गत २४ तासात या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात १० मीमी पावसाची नोंद झाली आहे. तीन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून ३२६.३४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ४३.४४ टक्के आहे. पुजारीटोलाचे दरवाजे उघडल्यानंतर या प्रकल्पाचेही आणखी दरवाजे उघडावे लागणार आहे.
वैनगंगा दुथडी भरून
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. कारधा येथे वैनगंगेची पातळी मंगळवारी २४३.२२ मीटर नोंदविण्यात आली. ४९९९.७५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून याठिकाणी २४५ मीटर धोक्याची पातळी आहे. वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.