मध्य प्रदेशच्या तस्करांनी पाेखरले महाराष्ट्राचे रेती घाट; प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू आहे मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 11:53 AM2022-05-30T11:53:41+5:302022-05-30T12:47:48+5:30
महाराष्ट्राच्या वाट्याची संपूर्ण रेती मध्य प्रदेशात पळविली जात असून, शासनाचा महसूलही बुडत आहे.
ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा : महाराष्ट्रातील रेती घाटांवर मध्य प्रदेशातील रेतीतस्कर खुलेआम उत्खनन करीत आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी तस्करांचा धुमाकूळ सुरू असताे. नदीपात्रात सीमांकन नसल्याचा फायदा मध्य प्रदेशातील तस्कर घेत आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याची संपूर्ण रेती मध्य प्रदेशात पळविली जात असून, शासनाचा महसूलही बुडत आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात हा प्रकार चक्क प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवरून वैनगंगा आणि बावनथडी नदी वाहते. वैनगंगा नदीवर बपेरा, तर बावनथडी नदीवर देवनारा, चिखली, आष्टी, नाकाडाेंगरी, वारपिंडकेपार आणि चांदमारा रेती घाट आहेत. मध्य प्रदेशातील वैनगंगा व बावनथडी नदीवरील घाटांचे लिलाव झाले आहेत, तर महाराष्ट्र सीमेतील एकाही रेती घाटाचा तीन वर्षांपासून लिलाव झालेला नाही. याचाच फायदा मध्य प्रदेशातील रेतीतस्कर घेत आहेत.
सीमेवरील सात रेती घाटांवर दरराेज उत्खनन केले जात आहे. मध्य प्रदेश सरकारकडून लिलाव घेणारे कंत्राटदार महाराष्ट्राच्या सीमेत येऊन उत्खनन करीत आहेत. या सातही घाटांवर दरराेज ३०० वाहनांचा ताफा उत्खनन करताना दिसून येताे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी महाराष्ट्राच्या सीमेत शिरून उत्खनन केले जाते. दिवसा मात्र मध्य प्रदेशाच्या सीमेतून रेतीचा उपसा केला जाताे.
नदीपात्रात सीमांकनाचा अभाव
वैनगंगा आणि बावनथडी नदीत सीमांकनच झालेले नाही. नदीपात्रात खांब लावून सीमांकन करणे अपेक्षित हाेते. त्यासाठी भंडारा महसूल विभागाने पुढाकार घेण्याची गरज हाेती; परंतु असे सीमांकनच केले जात नाही. त्यामुळे काेणत्या राज्याच्या सीमेतून रेतीचे उत्खनन केले जाते याचा थांगपत्ता लागत नाही. परिणामी, कारवाईही हाेत नाही.