आंधळगाव ठाण्याच्या हद्दीत जनावरांची तस्करी जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:59 AM2019-07-10T00:59:32+5:302019-07-10T00:59:57+5:30
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून याचे मुख्य केंद्र मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दरमहा लाखो रुपयांची वसुली पोलिसांकडून केली जात असून कामठी आणि मध्यप्रदेशातून आलेल्या व्यापाऱ्यांना येथे लुटल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून याचे मुख्य केंद्र मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दरमहा लाखो रुपयांची वसुली पोलिसांकडून केली जात असून कामठी आणि मध्यप्रदेशातून आलेल्या व्यापाऱ्यांना येथे लुटल्या जात आहे.
गत तीन वर्षांपासून जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात गाय, बैल यासह म्हशींचा समावेश असतो. आंधळगाव पोलीस ठाण्यांतर्गत धोप येथे नागठाणा रस्त्यावर शेकडो जनावरे गोळा केली जातात. रात्रीच्या वेळी या जनावरांना वाहनात कोंबले जाते. या ठिकाणी आंबागड, रामपूर, गायमुख नगर, ताडगाव, जांब, नवेगाव, सिवनी येथील जनावरे आणली जातात. अत्यंत निर्दयपणे वाहनात ही जनावरे कोंबून त्यांचा प्रवास केला जातो. आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरु आहे. पोलीस जाणीवपूर्वक बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या जनावर तस्करांकडून दरमहा लाखो रुपयांची वसुली केली जात असल्याची माहिती आहे.
आंबागड येथे बैलबाजार बंद करण्याकरिता एका संघटनेने पुढाकार घेता होता. पुन्हा पोलिसांच्या आशीर्वादाने बैलबाजार सुरु झाला आहे. रस्त्याने जनावरांची वाहतूक भरधाव वेगाने केली जाते. वाहनांमध्ये जनावरे अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबली जातात. त्यामुळे काही जनावरांचा तडफडून मृत्यू होतो. महिनाभरापूर्वी नागपूरच्या प्राणीमित्र संघटनेने या परिसरात जनावरांचे ट्रक पकडून पोलिसांच्या हवाली केली होते. परंतु त्यानंतरही हा प्रकार खुलेआम सुरु आहे.
आंबागड वरून जनावरे पायी धोप येथे आणले जातात. तेथून ट्रक व इतर वाहनांद्वारे जनावरे विकण्यासाठी नेले जातात.
यात मध्यप्रदेश आणि कामठी येथील व्यापाऱ्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे हा बाजार आता शेतकºयांचा राहिला नसून व्यापाºयांच्या दावणीला बांधला आहे. मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात जनावरे येथे विक्रीसाठी नेली जातात. यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. गायमुख, जांब, कांद्री या मार्गाने ही वाहतूक होत आहे. जंगलव्याप्त गावात सदर बाजारातून वाहतूक होत असताना हप्तेखोरीमुळे पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.
बैल बाजाराला पोलिसांचा आशीर्वाद
आंबागड येथे भरणाºया बैल बाजाराला एका संघटनेने विरोध दर्शविला होता. त्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. पोलिसांनी जनावरांचा बाजार बंद केला. परंतु काही दिवसातच पुन्हा हा बाजार सुरु झाला आाहे. या बैलबाजाराला आंधळगाव पोलिसांचा आशीर्वाद असून व्यापाºयांशी येथील पोलिसांचे हितसंबंध गुंतले असल्याची चर्चा आहे.