बदली पासच्या नावावर सागवान तस्करी; वनविभागाचे साटेलोटे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 05:51 PM2023-01-12T17:51:44+5:302023-01-12T17:53:16+5:30
गोंदिया जिल्ह्यातील तस्करीचे लाखनी केंद्र
भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील जंगलात कटाई करून बदली पासच्या नावाखाली सागवानाची खुलेआम तस्करी सुरू असून, तस्करीचे मुख्य केंद्र लाखनी तालुका झाले आहे. गोठणगाव, नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव आणि लाखांदूर परिसरातील सरकारी जमिनीवरील सागवान लाकडाचा लाखनी परिसरात साठा केला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातून शासकीय जागेवरील सागवान लाकडांची तोड करण्यात येत आहे. सागवान लाकडे लाखनीजवळ असलेल्या एका शेतशिवारात कंत्राटदाराने आणून ठेवली आहेत. जुन्या लाकडांवर हॅमर असून, तस्करी केलेल्या लाकडांवर हॅमर नसल्याने ही लाकडे आली कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सागवान जंगलातीलच असल्याचे बोलले जात आहे. वनअधिकारी कार्यालयातच बसून असतात. एरवी शेतकरी शेतावरील लाकूड कापून आरामशीनवर आणतात तेव्हा त्याला प्रश्नांची सरबत्ती करून मानसिक त्रास दिला जातो. मात्र, या तस्करांशी साटेलोटे असल्याने कारवाई करण्यात येत नाही. बदली पासच्या नावावर तस्करीतील लाकडांवर हॅमर मारले जात असल्याची माहिती आहे. यातून मोठी उलाढाल होत असून, अनेक जण यात गुंतले आहेत.
खुलेआम सागवान तस्करी होत असून, लाखनी वनपरिक्षेत्र कार्यालयाची चौकशी करण्याची गरज आहे. तस्करांनी आणलेल्या लाकडांवर बदली पासच्या नावावर हॅमर तर पडत नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. या तस्करांना आळा घालण्यासाठी वन विभागाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी आहे.