नळातून निघाला साप !
By admin | Published: May 31, 2016 12:37 AM2016-05-31T00:37:50+5:302016-05-31T00:37:50+5:30
शीर्षक वाचून दचकलात ना! परंतु हे खरे आहे. शहरातील राजेंद्र वॉर्डातील शुक्रवारी परिसरातील रहिवाशी अनिल श्रावण गौरी यांच्या घरी ...
शुक्रवारी वॉर्डातील प्रकार : लोकप्रतिनिधी एकत्र का येत नाहीत?
भंडारा : शीर्षक वाचून दचकलात ना! परंतु हे खरे आहे. शहरातील राजेंद्र वॉर्डातील शुक्रवारी परिसरातील रहिवाशी अनिल श्रावण गौरी यांच्या घरी सोमवारी सकाळी ७.२० वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा परेश हा पाणी भरत होता. यावेळी नळातून चक्क साप आल्याने त्याची भंबेरी उडाली.
आजपर्यंत नारू आल्याचे ऐकिवात आहे. मात्र नळाच्या पाण्यातून चक्क साप निघाला. ही वार्ता परिसरात पसरताच या सापाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला सोडण्यात आले.
मागील दोन वर्षापासून भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगेत नागनदीचे मलमुत्रयुक्त पाणी येत असल्यामुळे वैनगंगा नदी दूषित झाली आहे. याच नदीतून शहराला पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचा प्रवाह बदलविण्यात यावा या मागणीसाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला असला तरी नागनदीचे पाणी वैनगंगा नदीत येणे थांबविण्यात आलेले नाही. आधीच शहरातील पाईपलाईन जीर्ण असल्यामुळे ठिकठिकाणी दूषीत पाण्याचा पुरवठा होतच आहे.
याशिवाय मागील तीन महिन्यांपासून या नदीत ‘इकार्निया’ या जलजन्य वनस्पतीने डोके वर काढल्यामुळे संपूर्ण नदीपात्र या वनस्पतीने आच्छादले आहे. ही वनस्पती दररोज कित्येक पटीने वाढत आहे. परंतु कमी होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. मागील रविवारी लाखनी येथील एका इसमाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. ईकार्निया ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांचा मृतदेह तीन दिवसांनंतर नदीपासून तीन कि.मी. अंतरावर आढळून आला.
(जिल्हा प्रतिनिधी)
आणखी किती सहन करायचे?
भंडारा शहराला याच वैनगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. मागील दोन वर्षांपासून येथील नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सर्वांनाच दूषीत पाण्याचा पुरवठा होत असला तरी सधन नागरिकांनी आरओ लावून घेतले आहेत. यात गरीब बळी पडत आहे. गरिबांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. अशा स्थितीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही लोकप्रतिनिधी, नगर पालिका पदाधिकारी केवळ निवेदने देत आहेत. निवेदने देण्याची ही वेळ नाही. ही गंभीर समस्या निराकरणासाठी एकत्र येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरिकांच्या संयम सुटण्याचा अंत कुणी पाहू नये.