सर्पदंशाने मुलीचा मृत्यू, वडील बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:12 AM2019-09-06T01:12:42+5:302019-09-06T01:13:23+5:30
नेहमीप्रमाणे हा परिवार मंगळवारच्या रात्री घरी झोपला होता. त्रिवेणी आपले वडील अरुण लेदे यांच्यासोबत झोपलेली होती. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्रिवेणी लघुशंकेसाठी उठली. आईसोबत बाहेर गेली. बाहेरुन आल्यानंतर झोपताच माझा पाय जड वाटतो असे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भुयार : काळ कुठे आणि कसा दडून बसलेला असेल हे सांगता येत नाही. हेच बघा ना वडिलांसोबत झोपलेल्या एका बालिकेचा पांघरुणात असलेल्या विषारी सापाच्या दंशाने मृत्यू झाला तर वडील थोडक्यात बचावले. ही हृदयद्रावक घटना पवनी तालुक्याच्या निष्टी येथे घडली.
त्रिवेणी अरुण लेदे (९) असे मृत बालिकेचे नाव आहे. नेहमीप्रमाणे हा परिवार मंगळवारच्या रात्री घरी झोपला होता. त्रिवेणी आपले वडील अरुण लेदे यांच्यासोबत झोपलेली होती. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्रिवेणी लघुशंकेसाठी उठली. आईसोबत बाहेर गेली. बाहेरुन आल्यानंतर झोपताच माझा पाय जड वाटतो असे सांगितले. त्यावेळी आईने घरातील दिवा सुरु केला. लख्ख प्रकाशात अरुण झोपून असलेल्या पांघरुणावर अगदी छातीच्या बाजूने साप दिसला. त्यामुळे पाचावर धारण बसली. मात्र प्रसंगावधान राखत त्रिवेणीच्या आईने क्षणाचाही विलंब न लावता पांघरून ओढून दूर फेकले.
त्यानंतर साप निघून गेला. परंतु इकडे त्रिवेणीची प्रकृती बिघडली. पाय सुजलेला दिसू लागला. सापाने चावा घेतल्याची खात्री पटली. लगेच तिला पवनीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. प्रकृती सुधारत नसल्याने तिला भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तिच्यावर उपचार सुरु झाले. परंतु उशिरा रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू झाल्याचे कळताच आईने टाहो फोडला.
त्रिवेणी ही तिसऱ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी होती. तिच्या मृत्यूची वार्ता गावात येताच हळहळ व्यक्त होत आहे. आईच्या समयसूचकतेने वडीलांचा प्राण वाचला तरी त्यांच्या काळजाचा तुकडा मात्र काळाने हिरावून नेला. याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काळ कोणत्या रुपाने कसा येईल हे सांगता येत नाही. वडिलांच्या पांघरुणात आलेल्या सापाने चिमुकलीचा बळी घेतला.