तर, भंडारा बेचिराख झाले असते...; ऑर्डनस फॅक्टरीची मजबूत इमारत कोसळली पण आरडीएक्सला धक्का नाही
By नरेश डोंगरे | Updated: January 25, 2025 21:56 IST2025-01-25T21:56:22+5:302025-01-25T21:56:45+5:30
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह बिल्डिंग नंबर २३ मध्ये शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

तर, भंडारा बेचिराख झाले असते...; ऑर्डनस फॅक्टरीची मजबूत इमारत कोसळली पण आरडीएक्सला धक्का नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुरक्षेच्या संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे एवढा मोठा भीषण स्फोट होऊनही ऑर्डनस फॅक्टरीच्या परिसराबाहेर त्याची धग पोहोचली नाही. सुरक्षेच्या उपाययोजना झाल्या नसत्या तर या स्फोटाची तीव्रता अधिक भयानक झाली असती आणि अख्खा भंडारा बेचिराक झाला असता, अशी माहिती वजा प्रतिक्रिया संबंधित सूत्रांनी लोकमतला दिली
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह बिल्डिंग नंबर २३ मध्ये शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या स्फोटामुळे अत्यंत मजबुतीने बांधण्यात आलेली एलटीपिईची इमारत अक्षरशः जमीनदोस्त झाली. विशेष म्हणजे, या इमारतीत २.५ टनांपेक्षा जास्त आरडीएक्स होते. ते या बिल्डिंगच्या मलब्यात दबले गेले. गेल्या २४ तासांपासून हे आरडीएक्स सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम फॉरेनसिक टीम करीत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरडीएक्स सारखे शक्तिशाली स्फोटक ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी हा भयंकर स्फोट झाला. यातील पाच ते दहा टक्के आरडीएक्स स्फोटाच्या कचाट्यात आले असते, तर एक भयंकर स्फोट होऊन अख्खे भंडारा बेचिराख झाले असते. मात्र ज्या ठिकाणी हे आरडीएक्स ठेवले गेले होते, ते विशिष्ट आवरणात अत्यंत सुरक्षितरित्या होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरडीएक्सचा स्फोट घडविण्यासाठी डीटोनेटर कनेक्ट करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे शोभेच्या दारूगोळ्यात किंवा फटाका फोडताना आधी फटाक्याची पुंगळी केली जाते किंवा गोळा केला जातो त्यात वात लावली जाते आणि या वातीला आग लावल्यानंतर त्याचा स्फोट होतो त्याप्रमाणेच आरडीएक्सला डीटोनेटरचे कनेक्शन करून स्फोट घडवून आणला जाऊ शकतो. सुदैवाने हे कनेक्शन तेथे नव्हते. उच्च दर्जाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स तेथे होते मात्र त्याचा स्फोट होणार नाही, या संबंधाने सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून ठेवण्यात आल्या होत्या. त्याचमुळे शुक्रवारी भयंकर स्फोट होऊनही डीटोटोनेटर्स बिल्डिंगच्या मलब्यात गाडले गेले.
हे आरडीएक्स सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी डिफेन्स आणि फॉरेन्सिक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २४ तासापासून काम सुरू आहे. शीर्षस्थ सूत्रानुसार, ते बाहेर काढण्यासाठी विशिष्ट रसायन मिश्रित पाण्याचा मारा करण्यात येतो आणि त्यानंतर हे आरडीएक्स बाहेर काढले जाते.
भंडारा येथील पोलीस अधीक्षक नुरल हसन यांच्याशी यासंबंधने संपर्क केला असता त्यांनी "आम्ही बंदोबस्ताकरिता आवश्यक ते मनुष्यबळ तिथे नेमले असून बाकी सर्व काम संरक्षण खात्याचे तज्ञ करीत आहेत, याबद्दल मला काही सांगता येणार नाही" अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.