जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये आतापर्यंत केवळ २३.९९ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:36 AM2021-07-28T04:36:55+5:302021-07-28T04:36:55+5:30
भंडारा : तलावाचा जिल्हा आणि मुबलक पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात जुलै महिना संपत आला तरी अद्याप दमदार पावसाचा ...
भंडारा : तलावाचा जिल्हा आणि मुबलक पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात जुलै महिना संपत आला तरी अद्याप दमदार पावसाचा पत्ता नाही. पावसाने सरासरी गाठली असली तरी जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि माजी मालगुजारी तलाव अशा ६३ प्रकल्पांमध्ये सध्या २९.२२ दलघमी म्हणजे केवळ २३.९९ टक्केच जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ३२.३५ टक्के पाणी संचित झाले होते.
भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द, बावनथडी हे मोठे प्रकल्प असून, यासोबतच चार मध्यम प्रकल्प, ३१ लघु प्रकल्प आणि २८ माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव आहेत. यामुळे जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी मुबलक उपलब्ध असते. दरवर्षी जुलै महिन्यात साधारणत: ३५ टक्क्यांपर्यंत पाणी या प्रकल्पामध्ये साठते. परंतु, यंदा या प्रकल्पांमध्ये केवळ २९.२२ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ९.२०० दलघमी म्हणजे २१.४८ टक्के जलसाठा सद्य:स्थितीत आहे. गतवर्षी या चार प्रकल्पांत १०.४८१ दलघमी म्हणजे २४.४८ टक्के जलसाठा होता. तब्बल तीन टक्के जलसाठा कमी आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून, सद्य:स्थितीत या प्रकल्पात १४.९४ दलघमी जलसाठा असून, त्याची टक्केवारी २६.३२ आहे. गतवर्षी या प्रकल्पात १८.६१ दलघमी पाणी होते. या पाण्याची टक्केवारी ३४.७६ होती. २८ मामा तलावात सद्य:स्थितीत ५.९२ दलघमी पाणी असून, त्याची टक्केवारी २३.३२ आहे. गतवर्षी याच काळात १०.२८ दलघमी म्हणजे ४०.५१ टक्के जलसाठा होता. १७ टक्के जलसाठा कमी आहे.
जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते २७ जुलै या काळात ५३९.०१ मिमी पाऊस कोसळला. या कालावधीत ५८१.४ मिमी पाऊस अपेक्षित असतो. आतापर्यंत सरासरीच्या ९३ टक्के पाऊस कोसळला आहे. सुरुवातीला दमदार पाऊस कोसळला असला तरी अलीकडे पाऊस मात्र रिमझिम बरसत आहे. शेतकऱ्यांसह सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा झाल्यास रब्बी आणि उन्हाळी हंगामात सिंचनासाठी त्याचा उपयोग होतो. धान पिकासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे प्रकल्प कधी भरतात याकडे प्रशासनासह शेतकऱ्यांचेही लक्ष लागलेले असते.
गोसे प्रकल्पातून पाच दिवसांपासून पाण्याचा विसर्ग
मध्य प्रदेशासह पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने गोसे प्रकल्पाच्या पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी गत पाच दिवसांपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. भंडारा शहराजवळून वाहणारी वैनगंगा ही दुथडी भरून वाहत आहे. वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाल्याने २३ जुलैला सर्व ३३ गेट उघडण्यात आले होते. पाच दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाचव्या दिवशी मंगळवारी तीन गेट अर्धा मीटरने उघडून ७५८.२ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
गतवर्षी भंडारा शहरासह जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. मध्य प्रदेशातील संजय सरोवरसह शिरपूर, पुजारीटोला, कालीसराड, इटियाडोह आणि बावनथडी प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षी ३० आणि ३१ ऑगस्टला महापूर आला होता. गतवर्षीसारखी स्थिती यावर्षी होऊ नये म्हणून गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे.