साकोलीत पोलिसांची जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:13 AM2019-05-23T00:13:51+5:302019-05-23T00:14:36+5:30
साकोली तालुक्यात चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सध्या लग्नसराईचा मुहूर्त असल्याने साकोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत बन्सोडे यांनी साकोली येथील चौका-चौकात गर्दीच्या ठिकाणी व साकोली परिसरातील ५० गावामध्ये सूचना पत्रकाचे वाटप करून जनजागृती व प्रबोधन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : साकोली तालुक्यात चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सध्या लग्नसराईचा मुहूर्त असल्याने साकोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत बन्सोडे यांनी साकोली येथील चौका-चौकात गर्दीच्या ठिकाणी व साकोली परिसरातील ५० गावामध्ये सूचना पत्रकाचे वाटप करून जनजागृती व प्रबोधन केले.
चोरी होऊ नये याकरिता ठाणेदार बंडोपंत बन्सोडे यांनी प्रबोधन करताना सांगितले की आपण परिवारासह जात असल्यास आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी तसेच दागिने व रोख रक्कम बँक लॉकरमध्ये ठेवावी. गर्दीच्या ठिकाणी सोन्याच दागिने पर्स मोबाईल वापरताना खबरदारी घ्यावी.
आजुबाजूच्या परिसरात संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलीस ठाण्याला त्वरित माहिती द्यावी. बँकेतून पैसे काढल्यानंतर कोणी अनोळखी संशयीत व्यक्ती तुमच्यावर पाळत ठेवत असल्यास तत्काळ बँक मॅनेजर सोबत संपर्क करून पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. फेसबुक, व्हॉटअप, कुटुंबांचे फोटो अपलोड करताना त्याचा कोणी गैरवापर नाही याची खबरदारी घ्यावी. सर्व नागरिकांनी प्रत्येक धर्माचा आदर करावा, अफवावर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलिसांना सहकार्य करावे.
अनोळखी व्यक्तीस घरात येवू नये, आपल्या सबंधी त्यास कोणतीही माहिती देवू नये, बस किंवा रेल्वेने प्रवास करताना अनोळखी व्यक्तीकडून खाद्य पदार्थ दिल्यास त्याचे सेवन करू नये, त्यामध्ये गुंगीकारक पदार्थाचा वापर करून चोरी केली जावू शकते, महिलांनी घरी हजर असताना किंवा बाजारात खरेदी करताना किंवा प्रवासात कोणत्याही खोट्या आमिषाला अगर अफवांना बळी पडू नये, बँकेतून पैसे काढल्यास अनोळखी व्यक्तीस मोजण्याकरिता देवू नये किंवा दुचाकी वाहनाच्या डिक्कीमध्ये ठेवू नये, कोणतीही शासकीय नोकरी गुणवत्तेशिवाय मिळत नाही त्यामुळे शासकीय नोकरी मिळवून देण्याकरिता कोणालाही पैसे देवू नये.
साकोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत बन्सोडे यांनी ५० गावात पत्रके वाटून प्रबोधन केले. साकोलीमध्ये प्रत्येक दुकानदाराला पत्रक वाटण्यात आले. साकोली परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.