निवडणूक प्रचारात सामाजिक विचारमंथन आवश्यक
By admin | Published: December 24, 2015 12:44 AM2015-12-24T00:44:03+5:302015-12-24T00:44:03+5:30
अलीकडे देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात वैयक्तिक मानहानीने आणि अभद्र, सवंग भाषाप्रयोगांनी अत्यंत असभ्यतेचा तळ गाठला असून...
साकोली : अलीकडे देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात वैयक्तिक मानहानीने आणि अभद्र, सवंग भाषाप्रयोगांनी अत्यंत असभ्यतेचा तळ गाठला असून त्यामुळे आपल्या लोकशाही राष्ट्रापुढे राजकीय नैतिकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खरे तर निवडणुकांच्या प्रचारात विविध सामाजिक निकडीच्या प्रश्नांवरील गंभीर विचारमंथनाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध राजकीय विश्लेषक डॉ. जोगेंद्र गवई यांनी केले.
साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातर्फे सार्वत्रिक निवडणुकामधील अलीकडचे प्रचारप्रवाह व त्यांचा मतदानवर्तनावरील परिणाम या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रातील विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात आयोजिलेल्या या चर्चासत्रात बिलासपूर (छत्तीसगढ) येथील डॉ. ब्रिजकिशोर त्रिपाठी यांनी बीजभाषणातून निवडणुकांमधील भयमुक्त मतदानप्रक्रियेच्या आवश्यकतेवर विशेष भर दिला. याप्रसंगी चर्चासत्राचे संयोजक प्राचार्य डॉ. अशोक काळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रस्तुत विषयाचे गांभीर्य व महत्व अधोरेखित केले. या चर्चासत्राचा आरंभ दीपप्रज्वलनाने झाला.
यावेळी चर्चासत्राच्या विषयावरील शोधनिबंधक संग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. प्रस्तुत एकदिवसीय चर्चासत्रामधील सामाजिक व इलेक्ट्रॉनिक माध्यमाची भूमिका या विषयावरील पहिल्या सत्रात डॉ. मोहन काशीकर हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या सत्रात डॉ. विजय बोबडे व डॉ. ज्ञानेश्वर शंभरकर यांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केलेत.
निवडणुकांमधील मुद्रीत माध्यमे, दारोदार प्रचार आणि भव्य रॅलीच्या संदर्भातील दुसऱ्या सत्रांचे अध्यक्षस्थान डॉ. डी.आर. येवले यांनी भूषविले. या सत्रात डॉ. संजय मोरे व डॉ. प्रवीण भागडीकर यांची प्रभावी भाषणे झालीत. समारोपीय सत्रात डॉ. विवेक दिवाण व डॉ. नंदा सातपुते यांनी चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. प्राचार्य डॉ. अशोक काळे यांनी समारोपीय भाषणात गंभीर विचारमंथनासाठी सर्व मान्यवर व अभ्यासक वक्त्यांचे व उपस्थित प्रतिनिधीचेही आभार मानले.
या चर्चासत्रात डॉ. ए.एल. चुटे, डॉ. अमित टेंभुर्णे व डॉ. एल.पी. नागपूरकर यांनी सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी चर्चासत्राचे आयोजक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)