सामाजिक न्याय,न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:24 AM2021-02-22T04:24:16+5:302021-02-22T04:24:16+5:30
पी.एस.खुणे : शास्त्री विद्यालयात कायदेविषयक शिबिर भंडारा : स्थानिक लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय( माजी मन्रो) ...
पी.एस.खुणे : शास्त्री विद्यालयात कायदेविषयक शिबिर
भंडारा : स्थानिक लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय( माजी मन्रो) येथे विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात विधी सेवा प्राधिकरण भंडाराच्या निमंत्रित कायदेतज्ज्ञांनी दहावीतल्या विद्यार्थ्यांना विविध विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन केले. द ’मेंटनन्स ॲन्ड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीझन‘ या विषयावर ॲड. रेणुका बेदरकर यांनी मार्गदर्शन केले. ‘दी महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट’२०१५ या कायद्यांची माहिती ॲड. नेहा गजभिये यांनी दिली. विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.एन.के वाळके यांनी सामाजिक न्याय या संकल्पनेविषयी सखोल व अभ्यासपूर्ण भाष्य करुन त्याअंतर्गत एनएएलएसए या संस्थेचे कार्य कथन केले. या शिवाय महिला, मुली, बालकांच्या कायद्यांची माहिती दिली. जिल्हा न्यायाधीश-१ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस.खुणे यांनी या छोटेखानी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना समाजात कोणावरही अन्याय होऊ नये,न्यायापासून कोणीही वंचित राहू नये,संविधानाने दिलेले हक्क व अधिकार प्रत्येकाला उपभोगता यायला हवेत, सामाजिक न्याय हा न्याय्य समाजरचनेच्या निर्मितीसाठी उपयोगात यायला हवा, असे प्रतिपादन केले.
सामाजिक न्यायदिनानिमित्त शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यातल्या विजेत्यांना या वेळी विधी सेवा प्राधिकरणाकडून न्यायाधीश महोदयांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यात चेतना देवेंद्र निनावे इयत्ता सातवी हिला प्रथम पारितोषिक मिळाले तर नारायण देवकाते इयत्ता अकरावी याला द्वितीय पारितोषिक देण्यात आले तर तृतीय पारितोषिकाचा मानकरी भूषण नरेश डहाके हा ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या प्राचार्या केशर बोकडे यांनी प्रास्ताविक केले व अतिथींचे शाब्दिक स्वागत केले.या कार्यक्रमास माध्यमिक विभाग प्रमुख शालिकराम ढवळे,जिल्हा न्यायालयाचे कनिष्ठ लिपिक मोहन हुंडरी,हे उपस्थित होते. संचालन वरिष्ठ शिक्षिका स्मिता गालफाडे यांनी तर आभार प्रदर्शन वीणा सिंगणजुडे यांनी केले. निबंध स्पर्धेचे परीक्षण वीणा सिंगणजुडे, वैशाली तुमाने, नीता भोंगाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक सुनील खिलोटे, विजयकुमार बागडकर व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. कोरोनाच्या काळातील सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.