मतदार व लोकशाहीचे मीडियावर 'सोशल मॅरेज'; मतदानासाठी निमंत्रणपत्रिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 11:43 AM2024-11-13T11:43:36+5:302024-11-13T11:44:16+5:30
Bhandara : नागरिकांनी मतदान करण्यासाठी विविध उपक्रमातून मतदान जनजागृती
विलास खोब्रागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्ली / आंबाडी : देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदानाला फार महत्व आहे. नागरिकांनी मतदान करण्यासाठी विविध उपक्रमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यात सोशल मीडिया अग्रेसर असून सध्या सोशल मीडियावर काय वायरल होईल याचा नेम नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी मतदार व लोकशाहीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे या अनोख्या निमंत्रणपत्रिकेने मतदारांचे लक्ष वेधले आहे.
२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी राज्य सरकारने सर्वजनिक सुटी जाहीर केली आहे. मात्र अनेक मतदार माझ्या एका मताने काय होणार? असा विचार करून मतदान करीत नाही. त्यामुळे राज्य सरकार मतदान अभियानाद्वारे पथनाट्य, एकपात्री नाट्य तसेच रॅली काढून मी प्रथम भारतीय व अंतिमतः भारतीय असून मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
मात्र मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव मतदार व भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या लोकशाही यांचा बुधवार दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजताच्या शुभ मुहूर्तावर विवाह संपन्न होत आहे. महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी तसेच उज्ज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल महाराष्ट्र विधानसभेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतदानरूपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा. यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर येण्याचे भारतीय लोक, कु. निळीशाई व चि. इव्हीएम यांनी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या निमंत्रणपत्रिकेची सोशल मीडियावर तसेच मतदारांमध्ये चर्चा आहे.
निमंत्रण देण्याची पहिलीच वेळ
साधारणतः शासकीय किंवा घरगुती कार्यक्रमाप्रसंगी निमंत्रणपत्रिका छापून मान्यवर पाहुणे तसेच आप्त स्वकीय नातेवाइकांना पत्रिका देऊन कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण दिले जाते. मात्र मतदारांनी आवर्जून मतदान करावे, यासाठी निमंत्रण देण्याची ही पहिलीच वेळ असावी.