साकोलीत नाभिक समाजाचा मोर्चा
By admin | Published: September 16, 2015 12:30 AM2015-09-16T00:30:39+5:302015-09-16T00:30:39+5:30
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार गडकुंभली मार्गावरील संत सेनाजी महाराज मंदिराचे अतिक्रमण हटवून मूर्ती व साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली.
प्रकरण अतिक्रमणाचे : मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय
साकोली : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार गडकुंभली मार्गावरील संत सेनाजी महाराज मंदिराचे अतिक्रमण हटवून मूर्ती व साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली. त्याठिकाणी साकोली पंचायत समितीचे फलक लावण्यात आले.
मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी साकोली तालुका नाभिक समाज संघटनेने मंगळवारला मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. सदर भुखंड हा नाभिक समाजासाठी नियमित करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनानुसार, प्रशासनाने संत सेनाजी महाराज यांच्या मंदिराची तोडफोड केली. याची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली नाही. मंदिराचे अतिक्रमण हटविताना मूर्तीची विटंबणा करण्यात आली. जानेवारी २०१० ला संघटनेने ही जागा समाजासाठी देण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले होते.
मागील २५ वर्षापासून या जागेवर सामाजिक कार्यक्रम घेण्यात येत होते. मात्र अल्पसंख्यक समाज समजून राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आपसी वैरत्वाचा बळी घेण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने सदर जागा नाभीक समाज संघटनेच्या नावाने करण्यात यावे अशी मागणी केली. सदर मोर्चा गडकुंभली येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयात नेण्यात आला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चात जिल्हाध्यक्ष मधुकर फुलबांधे, सचिव विजय धोरेकर, शरद उरकुडे, साकोली तालुका अध्यक्ष जगदीश सुर्यवंशी, उपाध्यक्ष निताराम पोहनकर, कार्याध्यक्ष दुलीराम फुलबांधे, कोषाध्यक्ष मधुकर लांजेवार, सचिव सुनील सुर्यंवशी यांच्यासह नाभिक समाजाचे महिला व पुरुष सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)