सौर पथदिव्यांनी होणार दलित वस्त्या 'प्रकाशमान'
By admin | Published: February 1, 2015 10:50 PM2015-02-01T22:50:32+5:302015-02-01T22:50:32+5:30
दलित वस्तीतील नागरिकांचे जीवनमान उंचावे व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत.
प्रशांत देसाई - भंडारा
दलित वस्तीतील नागरिकांचे जीवनमान उंचावे व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागातील दलित वस्तीत सौर पथदिवे लावण्यात येत आहे. यातून जिल्ह्यातील १ हजार १५० दलित वस्त्या प्रकाशमान होणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांच्या विकासासाठी शासनाने अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. या अनुशंगाने, दलित समाज बांधवांचे जीवनमान उंचावे यासाठी, शासनाने समाजकल्याण विभागाची निर्मिती केली आहे. या विभागाच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधींचा निधी खर्च केल्या जातो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातून दलित वस्तीत नाली, रस्ता व समाजमंदिर बांधकाम करण्यात येते.
या विकास कामांसोबतच शहरी भागातील दलित वस्ती वगळता आता ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १ हजार १५० दलित वस्त्यांमध्ये हे सौर पथदिवे लावण्याचे काम सुरू झाले आहे. यातील काही वस्त्यांमध्ये सौर पथदिवे लागले आहे. या योजनेतून दलित वस्त्या प्रकाशमान होणार आहेत. यात सर्वाधिक ५०२ सौर पथदिवे भंडारा पंचायत समितीअंतर्गत गावांमध्ये लागणार आहेत.
गणेशपूर ग्रामपंचायतीतील दलित वस्तीत ३२ सौर पथदिवे लावण्यात येणार आहेत. दलित वस्तीच्या विकासासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने ४७ प्रस्ताव मंजूर केले आहेत. यात २५ ग्रामपंचायतींच्या ३० वस्त्यांचा समावेश आहे. यासाठी २ कोटी ३ लाख २७ हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या पुढाकारातून जिल्यातील दलित वस्ती सुधार योजनेचे कार्य झपाट्याने मार्गी लावण्यात येत आहे. दलित बांधवाना मिळणा-या सर्व सोयी सुविधांचा लाभ मिळावा या उद्दात्त हेतूने समाज कल्याण विभागातील कर्मचारी कार्य करीत आहेत.