हजेरीपटाची तांत्रिक अडचण त्वरित सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:37 AM2021-03-23T04:37:46+5:302021-03-23T04:37:46+5:30
बाराभाटी : गेल्या काही दिवसांपासून अर्जुनी-मोरगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यात मजुरांची हजेरी ऑनलाइन ...
बाराभाटी : गेल्या काही दिवसांपासून अर्जुनी-मोरगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यात मजुरांची हजेरी ऑनलाइन झाली असून, यामध्ये मागणी केलेल्या सर्व मजुरांची हजेरीपटावर नावेच येत नसल्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरूच आहे. ही तांत्रिक अडचण लवकरात लवकर सोडवा, अशी मागणी रोजगार हमी योजनेतील कामावर असलेल्या मजुरांनी केली आहे.
रोजगार हमी योजना कामांचा कारभार तहसील कार्यालय व पंचायत समितीतून हाताळला जातो. आता रोजगार हमी योजनेतील कामावर रोजगार सेवकांकडून मागणी केली जाते व मजुरांचे नावही ऑनलाइन हजेरीपटावर नोंदवून त्यांची मजुरी काढली जाते. मात्र, या ऑनलाइन हजेरीपटातून अनेक मजुरांची नावेच सुटत असल्याचा प्रकार घडत आहे.
या प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी केली असता काम करणारे कर्मचारी तांत्रिक अडचण आहे, असे सांगतात. संबंधित कर्मचारी हे संबंधित तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेला पाठवितात. पण त्यावर काही मार्ग सापडत नसल्याचे लक्षात येते, ही अतिशय गंभीर समस्या आहे.
ज्या मजुरांचे नाव ऑनलाइन हजेरीपटावर येत नाही त्याला आठवडाभर काम मिळत नसून आठवडाभराची मजुरीही मिळत नाही. असा प्रकार तांत्रिक अडचणींमुळे सुरू आहे. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून ही अडचण मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.
आमचे नाव नाही तर बेकारी भत्ता द्या
ज्या मजुरांची ऑनलाइन हजेरीपटावर नावे येत नाही त्यांचे नमुना-४ भरून क्लेम करून बेकारी भत्ता मिळतो. त्यासाठी रोजगार सेवकांकडून प्रकरण तयार करून संबंधित कार्यालयात दाखल करता येते.
ही फार गंभीर समस्या आहे, मी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो. ज्या मजुरांचे नाव आले नाही त्यांनी नमुना-४ भरून क्लेम करावा म्हणजे बेकारी भत्ता अशा मजुरांना मिळेल.
- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार तथा अध्यक्ष, रोजगार हमी योजना समिती