कोणी क्यूआर कोड पाठविलाय, अजिबात स्कॅन करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 07:00 AM2021-08-07T07:00:00+5:302021-08-07T07:00:07+5:30
Bhandara news सोशल मीडियाचा वापर योग्य कामासाठी न करता त्याच्या गैरवापराने फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी क्यूआर कोडचा वापर करून व्यवहार केले जातात. यातूनच फसवणुकीचे प्रकारही घडत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सोशल मीडियाचा वापर योग्य कामासाठी न करता त्याच्या गैरवापराने फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी क्यूआर कोडचा वापर करून व्यवहार केले जातात. यातूनच फसवणुकीचे प्रकारही घडत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.
यापूर्वी सीमकार्ड व्हेरिफिकेशनच्या नावाखाली संदेश पाठवून आर्थिक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः कोरोना संक्रमण काळात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. आता सर्वत्र व्यवहार सुरू झाले आहेत. प्रत्यक्षरीत्या बाजारपेठेत उलाढालही वाढली आहे. यात क्यूआर कोड स्कॅन करून फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. व्यवहारात कोणी क्यूआर कोड पाठविला तर त्याला लगेच स्कॅन करू नका. योग्य खात्री केल्याशिवाय प्रोसेसिंग करायची नाही, असा सतर्कतेचा इशाराही जिल्हा पोलीस दलाच्या सायबर क्राईम शाखेने दिला आहे. सतर्क राहूनच आर्थिक व्यवहार करावा तर कुठेही फसवणूक होणार नाही.
अशी होऊ शकते फसवणूक
फसवणूक करणाऱ्यांनी आता विविध शक्कल लढविली आहे. आधी सीम व्हेरिफिकेशन तर कोणी तुम्हाला जॅकपॉट लागला आहे, असे सांगून संदेश व किंवा क्यूआर कोड पाठविला जातो. अशी लिंक आल्यानंतर त्याला लगेच प्रतिसाद दिला जातो. अशातच फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अनोळखी नंबर किंवा लिंकमधून आलेले क्यूआर कोड कधीही स्कॅन करण्याची घाई करु नका. संबंधितांकडून खात्री केल्यावर व आपण काय व्यवहार करतो आहे, याची जाणीव ठेवावी. जेणेकरून फसवणूक होणार नाही. भंडारा जिल्ह्यात क्यूआर कोडने दोन जणांची फसवणूक झाल्याचे समजते; मात्र यापेक्षाही जास्त घटना घडल्या आहेत मात्र लोक समोर येऊन त्याबाबत तक्रार दाखल करीत नाहीत.
ही घ्या काळजी
कोणीही क्यूआर कोड पाठविला तर लगेच त्याला प्रतिसाद देऊ नका. योग्य खात्री झाल्याशिवाय समोर कुठलेही पाऊल उचलायचे नाही. विश्वास पात्र व्यक्ती किंवा संबंधितांकडून क्यूआर कोड आले असेल तर त्याला आधी तपासून पहा नंतरच आर्थिक व्यवहार करा. हीच काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः अशा क्यूआर कोड संदेशला दुर्लक्ष करणेच सर्वोत्तम उपाय आहे.