..म्हणून मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून, भंडारा जिल्ह्यातील खळबळजनक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 06:24 PM2022-04-08T18:24:57+5:302022-04-08T18:26:21+5:30
संतप्त मुलाने घरातून बांबूची काठी आणून वडील बाबूरावला मारहाण सुरू केली. काठीचा जोरदार प्रहार बाबुरावच्या डोक्यावर झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
पालांदूर (भंडारा) : आईला शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या मुलाने वडिलांचा बांबूच्या काठीने डाेक्यावर प्रहार करून खून केल्याची घटना लाखनी तालुक्यातील खराशी येथे गुरुवारी रात्री घडली. पालांदूर पोलिसांनी मुलाला अटक केली असून न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने लाखनी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
बाबुराव गणा कहालकर (६८) रा. खराशी, ता. लाखनी असे मृत वडिलांचे नाव आहे. तर मंगेश बाबुराव कहालकर (२८) असे आरोपी मुलाचे नाव आहे. वडील बाबुराव व मुलगा मंगेश यांच्यात नेहमीच दारूच्या नशेत वाद व्हायचे. गुरुवारी सायंकाळी दोघेही दारू प्राशन करून घरी आले. बाबुरावने आपली पत्नी सुमन हिला शिवीगाळ सुरू केली. आईला शिवीगाळ होत असल्याने मंगेश संतप्त झाला. घरातून बांबूची काठी आणून वडील बाबूरावला मारहाण सुरू केली. काठीचा जोरदार प्रहार बाबुरावच्या डोक्यावर झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी कहालकर यांच्या घराकडे धाव घेतली. शेजाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी पालांदूरच्या ग्रामीण रुग्णालय पालांदूर आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करताच मृत घोषित केले.
या घटनेची माहिती पालांदूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी आपल्या पथकासह खराशी येथे धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा केला. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी मंगेश कहालकर याला घरातूनच ताब्यात घेतले. आई सुमनच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३०२ कलमांन्वये गुन्हा नोंदवून शुक्रवारी सकळी अटक करून लाखनी येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. भांदवि ३०२ अन्वये गुन्ह्याची नोंद केली.
दारूच्या व्यसनाने केला घात
वडील बाबुराव व मुलगा मंगेश नेहमी दारूच्या नशेत असायचे. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद व्हायचे. बाबुरावला दोन मुले असून एक नागपूरला कामाच्या निमित्ताने असतो. तर मंगेश गावतच राहत असून तो अविवाहित आहे. दोघाही बापलेकांना दारूचे व्यसन असल्याने वाद व्हायचे. त्यामुळे शेजारीही त्यांच्या वादात लक्ष देत नव्हते. मात्र बुधवारी रात्री दारूच्या व्यसनाने घात केला. नेहमीप्रमाणे भांडण सुरू असेल म्हणून कुणी त्यांच्या मधात पडले नाही आणि मुलाने वडिलांना यमसदनी धाडले.