सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या अडचणीत वाढ
By admin | Published: April 11, 2016 12:25 AM2016-04-11T00:25:33+5:302016-04-11T00:25:33+5:30
पाणी पट्टी करांची वसुली प्रभावित झाली असल्याचे कारण वरून महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पाणीअभावी प्रकल्प स्थळातील उद्यान करपला : प्रकल्पाची उपयोगिता अधांतरी, पाणीपट्टी कराची वसुली प्रभावित
चुल्हाड (सिहोरा) : पाणी पट्टी करांची वसुली प्रभावित झाली असल्याचे कारण वरून महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या अडचणीत वाढ झाली आहे. थकीत विजेचे देयक करणारा निर्णय अद्याप झाला नसल्याने यंदा पावसाळ्यात प्रकल्प नदीपात्रातून पाण्याचा उपसा करणार किंवा नाही अशी शासंकता निर्माण झाली आहे.
सिहोरा परिसरात बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची राजकीय इच्छाशक्ती अभावी अधोगतीकडे वाटचाल सुरु झाली आहे. या प्रकल्पाकडे ४० लाख रुपयाची विजेची थकबाकी असल्याने गेल्या वर्षापासून वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. प्रकल्पाची सुरक्षा आता अंधारात केली जात आहे.यामुळे प्रकल्पस्थळात सध्या स्थित आलबेल सुरु असल्याचे चित्र आहे. या प्रकल्पस्थळात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे नियंत्रण आहे. परंतु या नियंत्रणात कपात करण्यात आली आहे. यंत्रणेचे अधिकार काढून घेण्यात आले आहे. पाटबंधारे विभाग पाणी पट्टी कराची वसुली आधी पासून करीत आहे. ही राशी शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात येत आहे. असे करीत असताना विजेचे देयक व देखभाल दुरुस्तीची कामे विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाच्या अधिकार क्षेत्रात होती. परंतु नव्या निर्देशाने आता ही जबाबदारी पाटबंधारे विभागाला देण्यात आली आहे. पाणी पट्टी करांच्या वसुलीमधून विजेचे देयकांचा भरणा करण्याचे पाटबंधारे विभागाला निर्देशित करण्यात आले आहे. यामुळे पाणीपट्टी करांच्या वसुलीवर प्रकल्पाचे भवितव्य आहे. शेतकऱ्यांकडे अंदाजे पाऊणे तीन कोटीच्या घरात पाणीपट्टी करांचे थकीत आहे. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने परिसरात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पाणीपट्टी कराची वसुली प्रभावित झाली आहे. नियोजनशून्यतेमुळे प्रकल्पाने शेतकऱ्यात नवसंजीवनी निर्माण करताना अपशय आले आहे. सन २०१३-१४ या कालावधीत रबी हंगामात पाणी वाटप झाले असले तरी नंतर या हंगामात ब्रेक देण्यात आले आहे. यंदा पावसाळ्यात प्रकल्प नदीपात्रातून पाण्याचा उपसा करणार किंवा नाही याचे नियोजन तुर्तास विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेकडे नाही. शेतकऱ्यांकडून वसुल होणाऱ्या पाणीपट्टी कराच्या राशीवरच प्रकल्पाचे भवितव्य असल्याचे नाकारता येत नाही.
ग्रामपंचायतीची मदत घेणार
प्रकल्प स्थळाला ४३ गावे जोडण्यात आली आहे. या गावातील शेतीला जलाशयाचे पाणी वाटप होत आहे. पाटबंधारे विभागात मुनष्यबळाचा अभाव असल्याने पाणीपट्टी कराची वसुली होत नाही. यामुळे शेतकऱ्यात प्रकल्पाचे भवितव्य जीवंत ठेवण्यासाठी थकबाकी वसुलीकरिता ग्रामपंचायतींना सहकार्यासाठी पाटबंधारे विभागाने पत्र दिले आहे. या संदर्भात विशेष ग्रामसभेचे आयोजन गावात होणार असल्याची माहिती मिळाली अहे.
जिल्हा परिषद सदस्य एकवटले
सोंड्याटोला प्रकल्पावरचे शेतकऱ्यांचे भवितव्य आहे. जलाशयात पावसाळ्यात अपेक्षेपेक्षा अल्प पाणी जमा होत आहे. यामुळे शेती तारणार नाही. यंदा प्रकल्प बंद ठेवल्यास मोठ्या संकटांना सामोरेजावे लागणार असल्याने पुढील प्रयत्नासाठी सिहोराचे धनेंद्र तुरकर, बपेराचे प्रेरणा तुरकर व चुल्हाडचे प्रतीक्षा कटरे असे तीन जिल्हा परिषद सदस्य राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेणार आहेत.