सोंड्याटोला सिंचन योजनेच्या टाकीतील गाळ उपसा अजूनही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 AM2021-05-25T04:38:58+5:302021-05-25T04:38:58+5:30
चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदी काठावर असणाऱ्या सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पंपगृहाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीतील गाळ उपसा करण्यात आलेला ...
चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदी काठावर असणाऱ्या सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पंपगृहाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीतील गाळ उपसा करण्यात आलेला नाही. पावसाळा तोंडावर असताना कामांना गती देण्यात आली नसल्याने पाणी उपसा करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. निधीअभावी प्रकल्पस्थळात समस्या वाढल्या आहेत. बावनथडी नदी काठावर असणाऱ्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पातून उपसा करण्यात आलेले पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. नदी पात्रात पाणी असताना प्रकल्प पाण्याचा उपसा करीत आहे. जुलै ते सप्टेंबर असे तीन महिने पंपगृह पाण्याचा उपसा करण्यासाठी सुरू ठेवण्यात येत आहे. पावसाळापूर्वी प्रकल्प स्थळात असणाऱ्या समस्या व अडचणी निकाली काढण्यासाठी प्राथमिकता दिली जात आहे. परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या पादुर्भावाने सारे गणित चौपट केले आहे. प्रकल्प स्थळात नदी पात्रातील पाणी आधी टाकीत साठवणूक करण्यात येत आहे. पहिल्याच पुरात लाकडी ओंडके वाहून येत असल्याने टाकीच्या दिशेने जाळी लावण्यात येत आहे. यानंतर टाकीत पाणी साठवणूक करण्यासाठी टाकीतील गाळ उपसा करण्यात येत आहे. परंतु गत चार वर्षांपासून टाकीतील गाळ उपसा करण्यात आलेला नाही. यामुळे टाकीत रेती व माती जमा झाली आहे. टाकीत पाण्याची साठवणूक करताना अडचणी येणार आहेत. याशिवाय पंपगृहात लाकडी ओंडके शिरण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात देखभाल व दुरुस्तीच्या कार्याला सुरुवात करण्यात येत नसल्याने ऐन पावसाळ्यात पाणी उपसा करताना यंत्रणेला डोक्यावर हात ठेवण्याची पाळी येत आहे. प्रकल्प स्थळात एकूण ९ पंप असले तरी, ८ पंप पाणी उपसा करण्यासाठी तयार आहेत. प्रकल्प स्थळात मुख्य समस्या टाकीतील गाळ आहे. गाळ उपसा करण्यासाठी ई- निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने यंदाही पाण्याचा उपसा करताना कसरत करावी लागणार आहे. वीज, पंपगृह, सुरक्षा गार्ड अशा स्वतंत्र निविदा काढण्यात येत आहेत. काही कामे कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात येत आहेत. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात निधी उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना संसर्ग पादुर्भाव वाढत असल्याने निधीत काटकसर केली जात आहे. अन्य कामे करणाऱ्या निविदाधारकांचे चुकारे थकले असल्याने त्यांची कामे करण्याची मानसिकता नाही. यामुळे विकास कार्यात खीळ बसली असल्याचे दिसून येत आहे. पाटबंधारे विभागाला प्रकल्पाचे हस्तांतरण करण्यात आले आहे. पाणीपट्टी कराची वसुली, करारनामा हा विभाग करीत आहे. विजेचे देयक गोंदिया जिल्ह्यातील विभागीय कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. कुणाच्या नियंत्रणात प्रकल्प आहे, कळायला मार्ग नाही. यामुळे प्रकल्प स्थळात आलबेल प्रकार सुरू आहे.
बॉक्स
जलाशयअंतर्गत नहराचे कामे अडले
खरीप हंगामात १२ हजार हेक्टर ओलिताखाली आणणाऱ्या चांदपूर जलाशयाच्या कामावर गेल्या अनेक वर्षांपासून निधी खर्च करण्यात आलेला नाही. जलाशयातील गाळ रोहयोअंतर्गत काढण्याची ओरड आहे; परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. कंत्राटदार व टक्केवारीच्या नादात ई-निविदेचे तुणतुणे वाजविण्यात येत आहे. जलाशयात दरवर्षी गाळ जमा होत आहे. पाण्याची साठवणूक क्षमता वाढत्या गाळामुळे कमी झाली आहे. याशिवाय चिकारची नादुरुस्ती यंत्रणेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. चिकार नादुरुस्त असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू राहत आहे. ब्रिटिशकालीन असल्याने चिकारने शंभरी ओलांडली आहे. गेट जीर्ण झाले आहे. पाणी विसर्ग करताना चिकारला हादरे बसत आहेत. यामुळे घाबरतच चिकारचे गेट उघडण्यात येत आहे. शासनाने सिंचन प्रकल्पात समस्या निकाली काढण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी आहे.
कोट
पंपगृहाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीतील गाळ उपसा करणे गरजेचे आहे. शासनाने तात्काळ निधी उपलब्ध केला पाहिजे. पावसाळा तोंडावर असल्याने या कामांना गती देण्याची गरज आहे.
किशोर राहगडाले, युवा नेते, बिनाखी.
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नदी पात्रातून पाणी उपसा करण्यासाठी ८ पंप तयार आहेत. यामुळे पाणी उपसा करताना अडचणी येणार नाहीत.
प्रकाश मेश्राम, निविदा कंत्राटदार, सोंड्याटोला प्रकल्प, सोंड्या.