सोंड्याटोला प्रकल्पातील पाइप चोरी प्रकरण निविदाधारकांच्या अंगलट येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:37 AM2021-07-30T04:37:04+5:302021-07-30T04:37:04+5:30
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात अनेक उपकरणे आहेत. लाखो रुपये किमतीचे साहित्य अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहेत. याच प्रकल्पाचे शेजारी गोडाऊन ...
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात अनेक उपकरणे आहेत. लाखो रुपये किमतीचे साहित्य अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहेत. याच प्रकल्पाचे शेजारी गोडाऊन तयार करण्यात आले आहे. गोडाऊनमध्ये टाकाऊ वस्तू ठेवण्यात आले आहेत. प्रकल्प व साहित्यांना सुरक्षा देण्यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यासाठी टेंडर काढण्यात येत आहेत; परंतु निविदाधारक नियम व अटींना हरताळ फासत आहेत. प्रकल्प स्थळात नऊ सुरक्षारक्षकांची पदे असताना ती भरली जात नाहीत. प्रकल्प स्थळात सहा आणि चांदपूर जलाशय परिसरात तीन सुरक्षारक्षक सुरक्षिततेकरिता नियुक्त करण्यात येत आहेत; परंतु निविदाधारकाने प्रकल्पस्थळात फक्त चार सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. प्रकल्प स्थळात सुरक्षारक्षकाचे पदे रिक्त असल्याने चोरट्याचे नजरा खिळल्या आहेत. १३ जूनला प्रकल्प स्थळाचे गोडाऊनमधून ३० पाइप चोरीला गेले आहेत. अट्टल चोरटे यात सहभागी झाले होते. नागपूरहून तडीपार करण्यात आलेला एक चोरटा यात होता. चोरट्यांनी ३० पाइप घानोड गावांचे शिवारात लपविले होते. पाइप चोरून नेताना एक चोर सुरक्षारक्षकांना गवसला होता. या चोराला रात्रभर प्रकल्प स्थळात ठेवण्यात आले होते. या चोराला समज देऊन सोडण्यात आले आहे. शासकीय संपत्तीची चोरी झाली असताना टेंडरधारक बेजबाबदारपणे वागले आहेत. पाइप चोरी प्रकरण अंगलट येणार असल्याने टेंडरधारकाने परस्पर दडपले आहे. सुपरवायझर गुलाब पटले यांनी प्रकल्प स्थळात पाइप चोरी झाले होते, असे सांगितले आहे. नंतर गोडाऊनमध्ये असणारे उर्वरित ९७५ पाइप प्रकल्प स्थळात आणण्यात आले आहेत. कुरेशी नामक निविदाधारकांचे सांगण्यावरून हे प्रकरण दडपण्यात आलेले आहे. अल्प सुरक्षारक्षकाच्या खांद्यावर सोंड्याटोला प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे चोरटे चोरीचे प्रयत्न करीत आहेत. रात्री प्रकल्प स्थळात २ सुरक्षारक्षक तैनात होते. पाइप चोरी करणारे ६ चोरटे होते. दिवसा २ आणि रात्री २ असे एकूण ४ सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात ६ सुरक्षारक्षकाची गरज आहे. पाइप चोरी प्रकरण निविदाधारकांच्या अंगलट येणार आहे. निविदा रद्द होण्याची शक्यता बळावली आहे.
बॉक्स
सुरक्षारक्षकाचे सेवेत आलबेल प्रकार
प्रकल्प स्थळात ४ सुरक्षारक्षक कार्यरत आहे. त्यांचे हजेरी पट नसून ड्रेस कोड नाहीत. त्यांच्याकडे आत्मसुरक्षेचे साहित्य नाही. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले नाही. अशा कोणत्याही सेवा व सुविधा या कार्यरत सुरक्षारक्षकांना देण्यात आलेल्या नाहीत. सुपरवायझर कधी भेट घेत नाही. शासकीय निधीचा लुटालुटीचा खेळ सुरू झाला आहे. शासनाला पूर्ण पदे भरण्यात आली असल्याची चुकीची माहिती देण्यात आली आहे. तात्काळ चौकशी झाली पाहिजे.
कोट
प्रकल्पाचे गोडाऊनमधून पाइप चोरी झाले होते. नंतर समज देऊन चोराला सोडण्यात आले आहे. शासकीय साहित्य असल्याने मनावर घेण्यात आले नाही.
-गुलाब पटले, सुपरवायझर, सोंड्याटोला सिंचन प्रकल्प