सोनी हत्याकांडाची सुनावणी आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 12:27 AM2017-06-19T00:27:01+5:302017-06-19T00:27:01+5:30
तीन वर्षांपूर्वी तुमसर शहरातील रामकृष्ण नगरातील रहिवासी तथा सराफा व्यापारी संजय सोनी यांच्या घरी दरोडा घालुन त्यांची पत्नी व मुलाची हत्या करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/तुमसर : तीन वर्षांपूर्वी तुमसर शहरातील रामकृष्ण नगरातील रहिवासी तथा सराफा व्यापारी संजय सोनी यांच्या घरी दरोडा घालुन त्यांची पत्नी व मुलाची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची सुनावणी सोमवारपासून (१९ जून) येथील जिल्हा व सत्र न्यायलयात सुरू होत आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज तुमसर येथे जावून सोनी यांच्या घराला भेट देवून पाहणी व कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर ते भंडाऱ्यात येऊन सुनावनी संदर्भात पोलिस तपासाची इत्थ्यंभूत माहिती याबाबत अधिका-यांशी चर्चा केली. सोमवारी होणाऱ्या सुनावणीसाठी अॅड. निकम उपस्थित राहणार आहेत.
तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची शिफारस खटला चालविण्याकरिता केली होती. आरोपींविरुद्ध भादंवि ३०२ खून करणे, ३९६ खुनासह दरोडा, ४४९ मृत्यूच्या शिक्षेचा गुन्हा करण्याकरिता गृहप्रवेश, १२० फौजदारी कट रचणे, २०१ पुराने नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
या आरोपपत्रात ९९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. सोनी यांच्या कुटुंबातील एकमेव त्यांची मुलगी हिरल सोनी बचावली.
अशी घडली होती घटना
सदर हत्याकांड २७ फेब्रुवारी २०१४ ला घडले होते. तुमसर शहरातील रामकृष्ण नगरातील सोनी यांच्या घरी सात दरोडेखोरांनी दरोडा घातला होता. यात संजय सोनी (४७) यांचा तिरोड्याजवळ रात्री गळफास लावून खून केला. नंतर तुमसर येथील घरी पत्नी पूनम सोनी (४३) व मुलगा द्रुमील (११) यांची हत्या केली होती. तुमसर येथून ४ व नागपूरातून ३ आरोपींना २४ तासात पोलीसांनी अटक केली होती. हे हत्याकांड राज्यात गाजले होते. पोलीसांनी २०१५ मध्ये ८०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.