बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:58+5:302021-06-16T04:46:58+5:30
जिल्ह्यात आजही अनेक शेतकरी सोयाबीन, तूर पिकाची पेरणी करतात. यासाठी शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा (बीएफ ) पद्धतीने पेरणी केल्यास ...
जिल्ह्यात आजही अनेक शेतकरी सोयाबीन, तूर पिकाची पेरणी करतात. यासाठी शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा (बीएफ ) पद्धतीने पेरणी केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडते. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी न करता घरातील असणाऱ्या बियाणांची बीजप्रक्रिया करून तसेच बियाणांची उगवण क्षमता चाचणी तपासूनच घरगुती बियाणांचा वापर करावा. बीज प्रक्रिया करताना बुरशीनाशक व कीटकनाशक जैविक हा क्रम लक्षात ठेवावा तसेच चांगली उगवण क्षमता व उत्पादन वाढवण्यासाठी येणाऱ्या काळात कीड रोगाचे प्रमाण कमी करून उत्पादन खर्चात बचत करणे गरजेचे आहे. यासाठी बीज प्रक्रिया बियाणांची उगवण क्षमता ही गरजेची असून शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक असल्याचेही जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले आहे.
बॉक्स
अशी करा बीज प्रक्रिया...
बीज प्रक्रिया करताना त्याला बुरशीनाशक पावडर लावून घ्या. पावडर मिसळताना हाताला प्लास्टिक पिशवी, डोळ्याला गॉगल, तोंडाला मास्क, रुमालाचा वापर करावा. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केल्यास ती फायदेशीर ठरते. बीज प्रक्रियेसाठी कोणतेही आंतरप्रवाही बुरशीनाशक चालू शकते. सोयाबीन पिकासाठी खोडमाशीचा प्रादुर्भाव सोयाबीनला झाल्यास पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते यासाठी बीज प्रक्रिया करताना थायोमेक्झाम (३४ % एफएस) हे कीटकनाशक १० मि.लि. प्रति किलो बियाणास लावावे. सोयाबीनसाठी नत्र स्थिर करण्यास व स्फुरद उपलब्ध करण्यासाठी रायझोबियम व पीएसबी हे जैविक घटक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बियाणास लावावे. जैविक बीज प्रक्रिया पेरणीआधी एक-दोन तास करून बियाणे सावलीत सुकवून ठेवणे गरजेचे आहे, असे कृषी विभागाने सांगितले आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहायक,पर्यवेक्षक, मंडल अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.