सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:32+5:302021-06-23T04:23:32+5:30
भंडारा : तालुक्यातील पल्हाडी येथे भंडारा तालुका कृषी विभागामार्फत २१ जून ते १ जुलै हा कालावधी कृषी संजीवनी सप्ताह ...
भंडारा : तालुक्यातील पल्हाडी येथे भंडारा तालुका कृषी विभागामार्फत २१ जून ते १ जुलै हा कालावधी कृषी संजीवनी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा प्रारंभ तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक योजनांची अद्ययावत माहिती व्हावी यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी दिली. यावेळी कृषी सेवक भाग्यश्री पडोळे, जवंजाळ, सरपंच लता गोस्वामी, उपसरपंच श्वेता चामलाटे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाने सोयाबीनची पेरणी करावी, रासायनिक खत बचत मोहीम, एक गाव - एक वाण, एकात्मिक कीड व्यवस्थापन, बीजप्रक्रिया मोहीम, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ कशी मिळवता येईल, आदी विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्राने लागवडीचे आवाहन करण्यात आले. पहेलाचे मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे यांनी जमीन सुपीकतेच्या दृष्टीने भातशेतीमध्ये खताचे नियोजन करून कृषी विभागाच्या ठिबक, तुषार सिंचन योजना व इतर योजनांची माहिती दिली.
बॉक्स : एक गाव - एक वाण लागवड करा
तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून एका गावातील शेतकऱ्यांनी एक गाव - एका वाणाची लागवड केल्यास कीड-रोग व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याने एक गाव - एक वाण लागवडीचे आवाहन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कीड रोग व्यवस्थापन व बाजारपेठ मिळविण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. यासाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे, असे सांगितले आहे.