विद्युततारांच्या स्पार्किंगमुळे तणसीच्या ढिगांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:58+5:302021-05-28T04:25:58+5:30
येथील गुलाब काटेखाये यांनी स्वतःच्या प्लॉटमध्ये गुरांच्या वर्षभराच्या चाऱ्याची व्यवस्था म्हणून सुमारे ३० हजार रुपये किमतीचे दोन तणसीचे ढीग, ...
येथील गुलाब काटेखाये यांनी स्वतःच्या प्लॉटमध्ये गुरांच्या वर्षभराच्या चाऱ्याची व्यवस्था म्हणून सुमारे ३० हजार रुपये किमतीचे दोन तणसीचे ढीग, विक्रम अवसरे यांनी सुमारे १० हजार रुपये किमतीचे तनसीचे ढीग जतन करून ठेवले होते. या ढिगांजवळ विद्युत विभागाच्या ३३ केव्ही आणि शेतीसाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या ११ केव्ही क्षमतेच्या विद्युतवाहक तारांचे क्रॉसिंग आहे. घटनास्थळाच्या शेजारचे बळिराम पवनकर हे घरी जात असताना त्यांना विद्युत तारांचे स्पार्किंग होताना दिसले. बळिराम पवनकर यांनी तातडीने ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टँकरसाठी संपर्क साधला. मात्र, संबंधितांशी संपर्क होऊ शकला नाही. दुपारची वेळ व सोसाट्याच्या वारा असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण करून सदर तणसीच्या ढिगांची राखरांगोळी केली. या आगीत पेटलेल्या तनसीच्या ढिगांजवळील पुंडलिक वकेकार यांच्या घराच्या खिडकीला आग लागली. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. त्याचप्रमाणे याच वेळात येथील टोलीवरील धनलाल बिलवणे यांच्या घराशेजारी ठेवलेल्या सदाशिव घावळे व गंगाधर घावळे यांच्या तणसीच्या ढिगांनासुद्धा आग लागून दोन्ही ढिगांची राखरांगोळी झाली. यात सदर दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. या दोन्ही घटनांमध्ये सदर चार शेतकऱ्यांच्या गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरपंच लोकेश भांडारकर यांनी प्रसंगावधान राखून पवनीच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळ गाठून आग नियंत्रणात आणली.