तूर उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2017 12:40 AM2017-01-25T00:40:45+5:302017-01-25T00:40:45+5:30
भंडारा धान उत्पादक जिल्हा असला तरी मागील वर्षी तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते.
हमीभाव केंद्राचा अभाव : प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
मुखरु बागडे पालांदूर
भंडारा धान उत्पादक जिल्हा असला तरी मागील वर्षी तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतले आहे. मात्र नाफेड अंतर्गत एकही हमीभाव केंद्र नसल्याने येथील शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून बोळवण होत आहे.
शेतकऱ्यांच्या अनभिज्ञतेचा फायदा घेत खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा २० ते २५ रुपये कमी मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. शासनाने तूर डाळीला ४६२५ रुपये व ४२५ रुपये बोनस जाहीर केला असतानाही शेतकऱ्याला मात्र त्याचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे घराघरात पोहचलेले खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची डाळ खरेदी करताना जुन्याच काट्याने किंवा पायलीने ती खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होत असल्याचे चित्र आता नित्याचे झाले आहे.
मागील वर्षी तूर डाळीचे भाव २०० रुपये किलोवर पोहचले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवनातील तूर डाळ दिशेनासी झाली होती. त्यामुळे नगदी उत्पादन म्हणून यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. त्यांना निसर्गानेही साथ देत तूर डाळीचे अधिक उत्पादन झाले. तुरीची डाळ विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा केंद्रसरकारच्या नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यात धान खरेदी केंद्रासारखे डाळ खरेदी केंद्र नाही त्यामुळे तूर डाळीला हमीभाव दिला असला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यापासून वंचितच राहावे लागत आहे.
नाफेड ने जिल्ह्यात हमी भाव केंद्र सुरु करावे अशी मागणी परिसरातील तूर उत्पादकांनी केली आहे. हमीभाव केंद्राअभावी जिल्ह्यातील डाळ खरेदी करणारे खाजगी व्यापारी शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करीत असले तरी त्यांना योग्य मोबदल्यापासून दूर रहावे लागत आहे. प्रतिकिलो मागे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रशासनाने ही बाब लक्षात घेता. जिल्ह्यात नाफेड अंतर्गत तुर डाळ खरेदी केंद्र सुरु करावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तूर खरेदी नाफेड मार्फत केली जाते. त्यानी जागा मागीतली तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यवस्था केली जाईल. भंडारा जिल्ह्यात नाफेड ही खरेदी यंत्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होणे शक्य आहे.
- संजय पारोदे, सचिव, कृउबा समिती लाखनी
शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी किमतीने तूर विकू नये, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तुरीची माहिती बाजार समितीला द्यावी नंतर त्याची माहिती जिल्हाधिकारी यांना देवून हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी करु.
- शिवराम गिऱ्हेपुंजे, अध्यक्ष, कृउबा समिती, लाखनी