नाथजोगी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 05:00 AM2021-02-24T05:00:00+5:302021-02-24T05:00:57+5:30
लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी या नाथजोगी समाजाच्या वस्तीला जिल्हाधिकारी कदम यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देत वस्तीतील सर्व समस्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील, असे सांगितले. या वस्तीत जमिनीचे पट्टे, घरकूल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, महिला स्वयंरोजगार, जात पडताळणी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ यासह शैक्षणिक समस्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत पुढे आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वर्षानुवर्षे अंधकारमय भविष्यासह जगत असलेल्या नाथजोगी समाजाच्या वस्तीत आता विकासाची पहाट उगवणार आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या वस्तीला भेट देऊन तेथील समस्या ऐकून घेतल्या. नाथजोगी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी या नाथजोगी समाजाच्या वस्तीला जिल्हाधिकारी कदम यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देत वस्तीतील सर्व समस्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील, असे सांगितले. या वस्तीत जमिनीचे पट्टे, घरकूल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, महिला स्वयंरोजगार, जात पडताळणी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ यासह शैक्षणिक समस्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत पुढे आले.
या वस्तीतील बहुतांश पुरुष बाहेरगावी भिक्षा मागणे आणि हस्तरेषा पाहण्यासाठी जातात. त्यामुळे लहान मुले आणि महिलाच या वस्तीत बहुतांशवेळा असतात. या मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्नही कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या वस्तीची माहिती मिळताच त्यांनी थेट कोदामेढी वस्ती गाठून तेथील समस्या ऐकून घेत त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या वस्तीत जिल्हास्तरीय अधिकारी पहिल्यांदाच पोहचल्याने नाथजोगींच्या अपेक्षा उंचावल्या आहे.
नाथजोगींना मिळणार जगण्याचे बळ
जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तीतील अनेक घरांना भेटी दिल्या. तेथील महिला व लहान मुलांशी संवाद साधला. आरोग्याच्या दृष्टीने चौकशी केली. मुलांना नियमितपणे शाळेत पाठवावे, असा आग्रह त्यांनी धरला. अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. आता या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच स्वत: पुढाकार घेतल्याने नाथजोगींना जगण्याचे बळ मिळाले आहे.