जिल्ह्यात लसीकरणाची विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:48+5:302021-06-17T04:24:48+5:30
भंडारा : कोरोना लसीकरणात कमी प्रतिसाद असलेल्या किंवा अत्यल्प प्रतिसाद असलेल्या गावांतील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी २१ व २२ जून ...
भंडारा : कोरोना लसीकरणात कमी प्रतिसाद असलेल्या किंवा अत्यल्प प्रतिसाद असलेल्या गावांतील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी २१ व २२ जून रोजी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. यासाठी शुक्रवारी ते रविवारदरम्यान विशेष जनजागृती अभियान घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दृरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाचा बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, डाॅ.माधुरी माथूरकर उपस्थित होते. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. कोरोनावर लस हाच एकमेव इलाज असून, नागरिकांनी लस घ्यावी यासाठी तालुकास्तरीय अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी गावात घरोघरी भेट देऊन लोकांना प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी कदम यांनी सांगितले. यासाठी गावचे सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकारी घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.
पुढील पाच ते सहा दिवस लसीकरणावर लक्ष केंद्रित करून कमी टक्केवारी असलेल्या गावांत लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात यावा, सर्व यंत्रणांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, अशी सूचना यावेळी देण्यात आली.
बाॅक्स
सोमवारी १३० तर मंगळवारी ११४ गावांत लसीकरण
भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात लसीबाबत अनेक गैरसमज असून हे गैरसमज दूर करून लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सोमवारी १३० गावांत तर मंगळवारी ११४ गावांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण कमी असलेल्या गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. भंडारा ५३, मोहाडी २६, साकोली ४८, लाखनी २५, पवनी ३९, लाखांदूर ३४, तुमसर १९ अशा २४४ गावांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.