राजा ढाले यांच्या भाषणातून मिळाली सम्यक, स्वाभिमानी विचारांची उर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:40 PM2019-07-16T23:40:09+5:302019-07-16T23:40:26+5:30
आंबेडकरी विचारवंत, थोर साहित्यिक, दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे मंगळवारी मुंबई येथे निधन झाले. या निधनाचे वृत्त भंडारा शहरात येताच सर्वत्र शोककळा पसरली. सहा वर्षापूर्वी भंडारात झालेल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या आठवणी ताज्या झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आंबेडकरी विचारवंत, थोर साहित्यिक, दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे मंगळवारी मुंबई येथे निधन झाले. या निधनाचे वृत्त भंडारा शहरात येताच सर्वत्र शोककळा पसरली. सहा वर्षापूर्वी भंडारात झालेल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या आठवणी ताज्या झाल्या. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवत तीन दिवस राजा ढाले यांनी भंडारात मुक्काम केला होता. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून सम्यक, स्वाभिमानी विचारांची ऊर्जा मिळाली. आजही त्यांचे ओजस्वी शब्द अनेकांच्या कानी गुंजत आहेत.
भंडारा येथे ११, १२ व १३ जानेवारी २०१३ रोजी ११ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. लक्ष्मी सभागृहात सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत तीन दिवस विचार मंथन झाले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राजा ढाले यांनी भूषविले होते. तर उद्घाटन नियोजन आयोगाचे माजी सदस्य नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले होते. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक आणि दलित पँथरचा महानायक तीन दिवस भंडारात मुक्कामी होते. आपल्या अध्यच्ीय भाषणाने त्यांनी सर्वांना चिंतन करायला भाग पडले होते. ते म्हणाले, ‘जगण्याची भीषण लढाई आपण लढली पाहिजे. आंबेडकर ही जात नाही, तर तो एक ज्वलंत विचार आहे. दलित व बौद्ध साहित्याऐवजी आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य असे नाव आपल्या साहित्य संमेलनाला दिले गेले पाहिजे. फुले-आंबेडकर म्हणजे जाती मोडणाऱ्या विचारांचे एक प्रस्फोटक केंद्र होय असे ते म्हणाले होते. आपली लढाई ही परिवर्तनाची लढाई आहे. फुले-आंबेडकर हे आपले आदर्श होत. आपले ही परिवर्तनाची लढाई आहे. याचा अर्थ ती इथल्या सामाजिक विषमतेविरुद्ध लढली जाणारी सामाजिक परिवर्तनाची लढाई आहे. फुले आणि आंबेडकर हे आधुनिक युगातील दोन महापुरुष जातीविहिन समाजरचना निर्माण करण्यास निघाले आणि इतिहासात एकामागोमाग एक असे सलग झालेले महापुरुष आहेत. विचारांचे हे अतुट नाते त्यांच्या पलिकडे असलेल्या इतिहासाच्या दुसºया कुठल्याही कालखंडात होऊन गेलेल्या दुसºया कोणत्याही महापुरुषात शोधून सापडणार नाही’, असे ते म्हणाले. भंडारा जिल्ह्याच्या आठवणी सांगताना राजा ढाले म्हणाले होते, खूप वर्षानंतर भंडाराच्या या भूमीवर आलो. १९७५ साली साकोली वरून मी माझ्या व्यवसायीक जीवनाला सुरुवात केली. आता आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भंडारात येणे झाले. यावेळी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अगदी सोप्या पद्धतीने सांगितले होते. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे व निमंत्रक प्रा.सत्येश्वर मोरे यांच्या मार्गदर्शनात साहित्य संमेलन घेण्यात आले होते.
राजा ढाले यांच्या आठवणींना उजाळा
राजा ढाले यांना अगदी जवळून तीन दिवस अनुभवण्याची संधी भंडारा येथील नागरिकांना मिळाली होती. या तीनही दिवसात ते स्टेजवर कमी आणि सर्वसामान्यात अधिक मिसळल्याचे दिसत होते. अधिकाधिक वेळ ते पुस्तकांच्या स्टॉलवर घालताना दिसून आले. आता हा लढवय्या आपल्यातून निघून गेला यावर भंडारेकरांचा आजही विश्वास बसत नाही. राजा ढाले यांच्या आठवणी सांगताना अकराव्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक अमृत बन्सोड म्हणाले, राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दु:खाचा डोंगर कोसळला. राजा ढाले भंडारात तीन दिवस अगदी सहज वावरले. त्यांच्या विचारातून आम्हाला प्रेरणा मिळाली. असे हे व्यक्तीमत्व हरपले आहे.