एसटीच्या विकासात स्पीड ब्रेकर!

By admin | Published: November 18, 2015 12:38 AM2015-11-18T00:38:55+5:302015-11-18T00:38:55+5:30

प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात तेच परंपरागत धोरण, नव्या बदलांकडे पाठ आणि प्रवाशांना काय हवे काय नको याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने

Speed ​​breaker in ST development! | एसटीच्या विकासात स्पीड ब्रेकर!

एसटीच्या विकासात स्पीड ब्रेकर!

Next

एस.टी. केव्हा टाकणार कात? : महामार्ग होऊनही वेग मात्र वाढेना, काळ बदलूनही एस.टी.ची सेवा मात्र ‘जैसे थे’च
भंडारा : प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात तेच परंपरागत धोरण, नव्या बदलांकडे पाठ आणि प्रवाशांना काय हवे काय नको याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने आणि भूमिकेने वाटचाल करणाऱ्या एसटी महामंडळाची प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रवासी ऐषोआराम पुरविणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत.
खाजगी वाहनांच्या तुलनेत हंगाम वगळता एसटीचे प्रवासभाडे नेहमीच खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक राहत असल्यामुळे प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत. प्रवासी पैसे मोजून स्लीपर क्लास बसेसमध्ये जाण्यास इच्छुक असताना एसटी महामंडळ मात्र त्याच पारंपरिक बसेस प्रवाशांना उपलब्ध करून देते.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक सुरू केली. परंतु बदलत्या काळानुसार एसटीला आपल्या धोरणात बदल करणे गरजेचे असताना एसटीने कुठलाच बदल घडवून आणला नाही. या कारणामुळे एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणारे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असून, एसटी महामंडळाची धावपळीच्या स्पर्धेच्या युगात कासवगतीने वाटचाल सुरू आहे.
बसेसमध्ये करमणुकीच्या साधनांचाही अभाव
खाजगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करताना प्रवाशांना गाणी, चित्रपट दाखविण्यात येतात. परंतु एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये अशी कुठलीच सुविधा नसते. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना कंटाळवाणे वाटते. यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये करमणुकीच्या साधनांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा
आधुनिक साधनांचा अभाव
महामंडळात चालक-वाहक, तंत्रज्ञांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे महामंडळाने ठरविलेले शेड्यूल वेळेवर चालू शकत नाही. त्यासाठी रिक्त पदांची समस्या निकाली काढण्याची गरज आहे. वाहतूक क्षेत्रात नवनवे तांत्रिक बदलासोबतच संगणकीकरण होत आहे. परंतु एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मात्र त्याच पारंपरिक पद्धतीने काम करताना दिसत असून एसटी कात टाकण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

‘स्पीड लॉक’मुळे प्रवासी कंटाळलेत
एसटी महामंडळाने आपल्या सर्व बसेसचा ‘स्पीड लॉक’ केलेला असतो. यामुळे एका विशिष्ट क्षमतेच्यावर एसटीच्या बसेस धावत नाहीत. यामुळे प्रवाशांना नियोजितस्थळी पोहोचण्यासाठी विलंब होतो. भंडारा - नागपूर हा आता चौपदरी मार्ग झाला आहे. तरीसुद्धा वेग बांधलेला असल्यामुळे या मार्गावर बसेस कमी वेगानेच धावतात. विशेष म्हणजे जलद आणि साधारण, जनता बसेसचा वेग सारखाच असतो. बस वेगाने चालविणे हे चालकावर अवलंबून असते. खाजगी वाहतुकीच्या वाहनांचा वेग एसटीच्या तुलनेत कितीतरी अधिक असतो. त्यामुळे प्रवाशांना वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. खाजगी वाहतुकीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाला ‘स्पीड लॉक’चे धोरण बंद करण्याची गरज आहे.

खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा भाडे अधिक
एसटी महामंडळाच्या बसेसचे प्रवासभाडे खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत नेहमीच अधिक असते. भंडाराहून नागपूरला जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स एसटीच्या बसपेक्षा १० ते १५ रूपये कमी तिकीट आकारून प्रवाशांची वाहतूक करते. परंतु एसटी महामंडळ स्पर्धेत उतरून प्रवासी मिळविण्याच्या उद्देशाने प्रवासी भाड्यात तडजोड करण्यासाठी तयार नाही. यामुळे एसटीचे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असून त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे.
बसेसची अवस्थाही दयनीय
एसटी महामंडळाच्या बसेस अनेकदा स्वच्छ नसतात. त्यामुळे बस पाहताच प्रवाशांना या बसने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न पडतो. बसमध्येही थुंकी, कचरा, घाण दिसल्यामुळे प्रवाशांचा भ्रमनिरास होतो. खाजगी बसेस चकाचक असतात. त्यातील सीटही आरामदायक असतात. प्रवासभाडेही एसटीच्या तुलनेत कमी असल्यामुळे साहजिकच प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सकडे आकर्षित होतात. स्लीपर क्लास, एसी बसेसची सुविधा नाहीत. लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी एसी आणि स्लीपर क्लास बसेसना प्राधान्य देतात. खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे बुकिंग करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना वेटिंगमध्ये राहावे लागते. प्रवासीवर्ग असताना एसटी महामंडळाने स्लीपर क्लास बसेस, एसी बसेस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही. यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सच्या स्लीपर क्लास बसेसने प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.

Web Title: Speed ​​breaker in ST development!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.