उड्डाणपुलाच्या बांधकामाला वेग, तज्ज्ञांचे पथक केव्हा येणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:11+5:302021-03-24T04:33:11+5:30
तुमसर : तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. रेल्वे व ...
तुमसर : तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. रेल्वे व राज्य शासनाच्या अखत्यारीतील उड्डाणपुलाच्या बांधकामाला पुन्हा वेग आला आहे, परंतु उड्डाणपूल भरावातून निघणाऱ्या राखेमुळे बांधकाम सुमारे चार ते पाच महिने बंद होते. दिल्ली येथील तज्ज्ञांचे पथक येऊन पाहणी करणार होते. पथक अजूनपर्यंत आले नाही, परंतु राज्य शासनाने पुन्हा उड्डाणपुलाच्या पोच मार्ग बांधकामाला पुन्हा वेग आला आहे.
देव्हाडी येथील रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपूल बांधकामाला हिरवी झेंडी दिली होती. सुमारे सहा वर्षांपूर्वी या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले होते.
अजूनपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे दर दिवशी रेल्वे फाटकावर वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूककोंडी होत आहे. रेल्वे प्रशासन व राज्य शासन येथे संयुक्तरीत्या उड्डाणपुलाचे बांधकाम करीत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकवरील गडर लॉन्चिंगचे काम यशस्वीपणे केले. गडर लॉन्चिंग झालेल्या ठिकाणी सिमेंट घालण्याकरिता सेंट्रिंगचे काम सुरू आहे. राज्य शासनाचे उड्डाणपुलाचे पोच मार्गाचे काम पुन्हा सुरू केले आहे. मागील सहा महिने हे काम बंद होते, हे विशेष.
उड्डाणपुलाच्या भरावात राखेचा वापर करण्यात आला होता. दोन्ही मार्गांच्या पोच मार्गावर पुलाच्या भरावातून मोठ्या प्रमाणात राख बाहेर निघत होती. त्यामुळे उड्डाणपुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दगडी पुलातून राख बाहेर निघत असल्यामुळे उड्डाणपुलात खड्डे निर्माण झाल्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे बांधकाम विभागाने हे काम थांबविले होते.
उड्डाणपुलातून निघालेली राख निघण्याचे कारण येथे शोधण्याकरिता दिल्लीच्या तज्ज्ञ पथकाला येथे पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे, परंतु अजूनपर्यंत दिल्लीचे पथक येथे आले नाही. पोच मार्गाचे काम पुन्हा येथे सुरू करण्यात आले आहे.
सध्या पोच मार्गावर काळी गिट्टी घालून त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे, परंतु पुलांमध्ये पोकळी असली, तर येथे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. पोच मार्गाचे काम पूर्ण होण्याच्या अगोदर दिल्ली येथील तज्ज्ञांच्या पथकाने संपूर्ण पुलाचे निरीक्षण करण्याची गरज आहे. सदर पूल हा दगडी असून, त्यात राखेच्या भराव करण्यात आला होता. पुलाच्या चारही बाजूला राख वाहून जाऊ नये, म्हणून पातळ पॉलिथिनच्या वापर करण्यात आला; परंतु काही ठिकाणी पॉलिथिन फाटल्याने ही राख पुलाच्या भरावातून निघत असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे येथे वाहतुकीचे प्रमाण मोठे असल्याने तज्ज्ञांच्या पथकाने संपूर्ण पुलाचे निरीक्षण करण्याची गरज आहे.