कुंभारांच्या चाकाला आधुनिक तंत्रज्ञानाची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:39 PM2019-01-30T22:39:06+5:302019-01-30T22:39:33+5:30

प्राचीन काळातील बारा बलुतेदारीतील महत्त्वाच्या कुंभार या बलुत्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा विपरित परिणाम झाला. प्लास्टिक आणि विविध साहित्याच्या वापराने कुंभारांच्या हाताला काम मिळेनासे झाले. परंपरागत कलेला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने हाती घेतला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कुंभाराच्या चाकाला गती दिली जात आहे.

Speed of modern technology | कुंभारांच्या चाकाला आधुनिक तंत्रज्ञानाची गती

कुंभारांच्या चाकाला आधुनिक तंत्रज्ञानाची गती

Next
ठळक मुद्देप्रशिक्षण शिबिर : मुंढरी येथे कलाकौशल्य विकास कार्यक्रमात ४० कारागिरांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्राचीन काळातील बारा बलुतेदारीतील महत्त्वाच्या कुंभार या बलुत्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा विपरित परिणाम झाला. प्लास्टिक आणि विविध साहित्याच्या वापराने कुंभारांच्या हाताला काम मिळेनासे झाले. परंपरागत कलेला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने हाती घेतला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कुंभाराच्या चाकाला गती दिली जात आहे.
कुंभार कलाकौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून परंपरागत कुंभार कलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. माठ, रांजण, पणती यासह विविध गृहोपयोगी वस्तू कुंभार तयार करायचे. परंतु अलिकडे कुंभाराच्या कलेला मागणीच घटली. त्यातच परप्रांतीय मंडळींनी या व्यवसायावर आक्रमण केले. त्यामुळे परंपरागत कुंभारांवर उपासमारीची वेळ आली. बदलत्या जगाचा अंदाज घेत आता त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहे.
खादी ग्रामोद्योग महामंडळाने यांत्रिकीकरणाच्या स्वयंचलित चाकावर मातीपासून विविध वस्तू कशा तयार करायच्या याचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हस्तशिल्पी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाठक यांच्या मार्गदर्शनात मोहाडी तालुक्यातील मुंढरी येथे दहा दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत परिसरातील ४० कुंभार सहभागी झाले. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर विजेच्या मदतीचे चालणाऱ्या स्वयंचलित चाकावर मातीचे भांडे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
दहा दिवसीय या प्रशिक्षणाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरेश पाठक, हस्तशिल्पी संस्थेचे सचिव राजाभाऊ रेवडकर, उपाध्यक्ष गजानन बुरबांदे, खादी ग्रामोद्योगचे कार्यकारी अधिकारी अरुण मालखेडे, सरपंच एकनाथ चौरागडे, कैलाश वरवाडे आदी उपस्थित होते. पूर्वी कुंभाराचे चाक फिरविण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागायचा. त्यानंतर चाकाला गती देऊन मातीला आकार दिला जायचा. यात मोठा वेळ जायचा. आता या तंत्रज्ञानाने वेळेची बचत होईल.
स्वयंचलित चाकाचे वितरण
या प्रशिक्षणात आंधळगाव, वडद, मुंढरी, अर्जुनी सडक येथील ४० कुंभारांनी सहभाग नोंदविला. या दरम्यान दहा कारागिरांच्या एका गटाला प्रतिव्यक्ती एक स्वयंचलित विजेवर चालणारे चाक नि:शुल्क प्रदान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Speed of modern technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.