ओव्हरटेकच्या नादात एसटी बसने घेतला तरुणाचा बळी; भंडारा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 04:01 PM2022-11-15T16:01:07+5:302022-11-15T16:13:18+5:30
करचखेडाची घटना : दुचाकीस्वार जागीच ठार
भंडारा : दुपदरी राष्ट्रीय महामार्गावर एका टिप्परला ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव एसटीने समाेरू येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना भंडारालगतच्या करचखेडा येथे साेमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
तरुण भंडारा तालुक्यातील चांदाेरी येथून शहापूर येथे जात असताना हा अपघात घडला. या अपघाताने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली हाेती. सुनीत साेमेश्वर मेश्राम (२१, रा. चांदाेरी मालीपार, हल्ली मु. शहापूर, ता. भंडारा) असे मृताचे नाव आहे. ताे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत हाेता.
सुनीत सोमवारी काही कामानिमित्ताने चांदोरी येथे आला हाेता. तेथून ताे दुचाकीने एम. एच. ३६, ई. ६३७५ ने शहापूरकडे जात हाेता. राष्ट्रीय महामार्गावर करचखेडा फाट्यासमाेर त्याचवेळी भंडारा आगाराची नागपूर- गाेंदिया एसटी बस (एम.एच. १४, बीटी ४९७५) एका टिप्परला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हाेती. त्यावेळी समाेरून आलेल्या सुनीतच्या दुचाकीला जबर धडक दिली. सुनीत बसखाली येऊन जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती हाेताच कारधा पाेलीस आणि महामार्ग पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारधाचे ठाणेदार राजेशकुमार थाेरात यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला. अपघाताने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली हाेती. पाेलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी एसटी बसचालक अमित माेहबे याच्याविरुद्ध कारधा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच वर्षांपूर्वी झाला हाेता आई-वडिलांचा मृत्यू
सुनीतच्या आईचा पाच वर्षांपूर्वी दिव्यामुळे जळाल्याने मृत्यू झाला हाेता. तर आईच्या मृत्यूने खचलेल्या वडिलांचाही अवघ्या सहा महिन्यांत मृत्यू झाला. त्यामुळे सुनीत आणि त्याचा लहान भाऊ पाेरके झाले. चांदाेरी येथून ते शहापूर येथे असलेल्या आपल्या माेठ्या आईच्या घरी राहत हाेते. साेमवारी ताे काही कामानिमित्त आला आणि अपघातात त्याचा बळी गेला. या घटनेने चांदाेरी आणि शहापूर येथे हळहळ व्यक्त हाेत आहे.