कोरोनाला हरविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने भंडारा जिल्ह्यात गावसीमाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 02:32 PM2020-04-24T14:32:08+5:302020-04-24T14:33:40+5:30
भंडारा जिल्हा सीमाबंदी सारखीच अनेक ठिकाणी गाव सीमाबंदी करून गावाभवताल जणू तटबंदीच उभारले आहे. महानगर आणि रेड झोनमधून चोरून लपून गावात शिरू पाहणाऱ्यावर ग्रामरक्षा दलाची करडी नजर असून २४ तास येथे खडा पहारा असतो.
ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रीन झोनमध्ये भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनासोबत गावकरीही पुढे सरसावले आहेत. जिल्हा सीमाबंदी सारखीच अनेक ठिकाणी गाव सीमाबंदी करून गावाभवताल जणू तटबंदीच उभारले आहे. महानगर आणि रेड झोनमधून चोरून लपून गावात शिरू पाहणाऱ्यावर ग्रामरक्षा दलाची करडी नजर असून २४ तास येथे खडा पहारा असतो. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला हरवायचेच, असा या गावकऱ्यांनी चंग बांधला आहे.
भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत सुदैवाने एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. प्रशासनाने खबरदारीसाठी कठोर उपाययोजना केल्या आहे. जिल्ह्याच्या नऊ सीमा प्रशासनाने सील केल्या आहे. मात्र रेड झोनमधील अनेक जण नजर चुकवून आणि लपूनछपून गावात शिरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाला कोरोनाचा धोका संभवत आहे. प्रशासन उपाययोजना करीत असला तरी ग्राम पातळीवर प्रत्येकाची चौकशी करणे प्रशासनाला अशक्य आहे. त्यासाठी भंडारा जिल्ह्यातील काही गावांनी आपल्या गावाच्या चक्क सीमा सील केल्या आहेत. गावाच्या चोहबाजूला लाकडी बॅरिकेटस् लावण्यात आले आहे. गावात कुठूनही प्रवेश करता येवू नये, यासाठी अडथळे निर्माण करण्यात आले आहे. अनेक गावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शनात ग्राम सुरक्षा दलाचे तरूण अहोरात्र खडा पहारा देत आहे. ओळखीचा असो की अनोळखी त्याची कसून चौकशी केली जाते. महानगरातून आलेल्या विशेषत: रेड झोनमधून आलेल्या व्यक्तीची माहिती अंगणवाडी सेविकेमार्फत प्रशासनाला दिली जाते.
मोहाडी तालुक्यातील हत्तीडोई, हरदोली यासाह लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील गावांमध्ये असे चित्र आता दिसत आहे. अनेक ठिकाणी गावात प्रवेश बंद असे फलकही लावण्यात आले आहे. गावातील व्यक्तीलाही बाहेर सोडताना त्याची खात्री करूनच परवानगी दिली जाते. लॉकडाऊन घोषित होवून आता महिना झाला आहे. गाव सुरक्षित ठेवण्यासाठी गावकºयांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. गावातील तरूण आळीपाळीने खडा पहारा याठिकाणी देत आहे. एकंदरीतच ग्रामीण भागातही आता कोरोनाबाबत जनजागृती यशस्वीपणे झाली असून कोरोनाशी दोन हात करण्यासाठी ग्रामीण जनताही सरसावली आहे.
नोंदवही आणि सॅनिटायझर
गावबंदी असलेल्या गावाच्या प्रवेश द्वारावर नोंदवही ठेवण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्याची प्रत्येकाची नोंद केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला सॅनिटाईज करूनच आत सोडले जाते. हरदोली येथील सरपंच सदाशिव ढेंगे म्हणाले, गावात कोरोना संसशीत शिरू नये यासाठी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला. याला गावकरीही सहकार्य करतात.