क्रीडा संकुलाचे लोकार्पण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:23 PM2018-09-22T22:23:36+5:302018-09-22T22:23:57+5:30
खेलो इंडिया उपक्रम देशात राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुकास्थळी क्रीडा संकुलावर कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. तुमसरात क्रीडा संकुलाचे बांधकाम सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाले. परंतु लोकार्पणाचा मुहूर्त अजूनपर्यंत सापडला नाही. ही प्रतीक्षा केव्हा संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : खेलो इंडिया उपक्रम देशात राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुकास्थळी क्रीडा संकुलावर कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. तुमसरात क्रीडा संकुलाचे बांधकाम सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाले. परंतु लोकार्पणाचा मुहूर्त अजूनपर्यंत सापडला नाही. ही प्रतीक्षा केव्हा संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील बॉक्सींग रिंग विभागीय स्पर्धेकरिता नागपूर येथे नेण्यात आली. मुलभूत साहित्य येथे अजुनपर्यंत उपलब्ध करून दिले नाही हे विशेष.
खेळामुळे व्यक्तीमत्व विकास होऊन क्रीडा संस्कृती रूजावी, खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण प्राप्त व्हावे याकरिता क्रीडा संकुल बांधकामाचे नियोजन तालुकास्थळी करण्यात आले. तुमसरात नेहरू क्रीडांगणाजवळ क्रीडा संकुलाचे बांधकाम सुमारे सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाले. सुमारे ९० लाख रूपये बांधकामावर खर्च करण्यात आले. सन २०१६ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात झाली होती. जून २०१७ मध्ये बांधकाम पूर्ण झाले.
येथे मल्टीपरपज हॉलची सुविधा उपलबध आहे. ४० लक्ष क्रीडा सुविधाकरिता खर्च करण्यात आले. स्केटींग, व्हॉलीबॉलचे क्रीडांगण तयार करण्यात आले आहे.
याकरिता ५० लक्ष व इतर कामांकरिता एक कोटींचा निधी येथे प्राप्त होणार आहे. येथे क्रीडा संकुलात बॉक्सींग रिंग उपलब्ध करून दिल्या होत्या, परंतु विभागीय क्रीडा स्पर्धा नागपूर येथे होत्या त्या रिंग नागपूर येथे नेण्यात आल्याची माहिती आहे. खेळाडूंना येथे मॅटची व्यवस्था नाही.मॅटची दूरावस्थेमुळे त्यात तणीस घालून खेळाडू सराव करीत असल्याचे समजते.
१५ आॅगस्टला क्रीडा संकुलाचे लोकार्पण होणार होते, परंतु ते झाले नाही कां झाले नाही ते अजुनपर्यंत कळले नाही. नगरपरिषदेने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यावरच क्रीडा संकुलाचे बांधकाम येथे सुरूवात झाली होती. क्रीडा संकुलाकरिता विघ्य येथे आले होते.
अनेक अडथडे पार केल्यानंतर क्रीडा संकुल तयार झाले. लोकार्पण केल्यानंतर खेळाडूंना अन्य सुविधा व उर्वरित कामे लवकर निकाली निघतील त्या करिता येथे पुढाकार घेण्याची गरज आहे. आमदार चरण वाघमारे यांनी मोठी धावपळ करून क्रीडा संकुल बांधकामाकरिता निधी खेचून आणला होता हे विशेष.
तुमसर येथील क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्णत्वास आल्याची माहिती संबंधित विभागाशी घेण्यात येईल. लोकार्पण केल्याने खेळाउू व क्रीडा मार्गदर्शकांना माहिती व इतर सोयी सुविधा उपलब्ध होतील.
-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर.
क्रीडा संकुलाचे लोकार्पण त्वरीत करून उर्वरित मुलभूत सोयी सुविधा व रखडलेली कामे संबंधित विभागाने पूर्ण करावे, खेळाला दुय्यम स्थान देता कामा नये.
-डॉ. पंकज कारेमोरे, युवा काँगे्रस नेते तुमसर.