क्रीडा प्रबोधिनीची निवड चाचणी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2017 12:22 AM2017-01-13T00:22:05+5:302017-01-13T00:22:05+5:30
अध्यापनाव्यतिरिक्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या एका शिक्षकाची बदली झाल्याने क्रीडा प्रबोधिनी चाचण्या रखडल्या आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष : आंदोलनाचा इशारा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
तुमसर : अध्यापनाव्यतिरिक्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या एका शिक्षकाची बदली झाल्याने क्रीडा प्रबोधिनी चाचण्या रखडल्या आहेत. यासंदर्भात खेळाडूंच्या पालकात तीव्र असंतोष असून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अध्ययनासोबतच क्रीडा क्षेत्रात आवड असल्याने जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे निवडीकरिता क्रीडा कौशल्य विकसीत करण्याकरिता दावेझरीटोला येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत अ.वा. बुद्धे खेळाडूंना मैदानावर सराव करवून घेतात. दररोज सकाळी ५ ते ७ व सायंकाळी ५.३० ते ७०० या वेळेत सुरू राहते.
निवड चाचण्या जवळ आल्यावरही सराव सध्या बंद आहे. अ.वा. बुद्धे यांचे स्थानांतरण लाखांदूर तालुक्यात करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात अ.वा. बुद्धे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनी करिता प्रशिक्षण सराव सुरू केला होता.
त्यांच्या अंतिम चाचण्या देव्हाडी येथील बड्डा क्रीडांगणावर घेण्यात येत होत्या. स्थानांतरणामुळे चाचण्या केव्हा व कुठे घ्यावा, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
या प्रकल्पातून आतापावेतो सुमारे १६० खेळाडूंची क्रीडा प्रबोधिनी निवड झाली आहे. यात राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत किशोरी गटात मयुरी लुटे हिने राष्ट्रीय विक्रम नुकताच नोंदविला.
शशकिला आगाशे रा. निलज हीने भारतीय संघात सायकलींग निवड करण्यात आली. आकाश शेंडे यांची जागतिक क्रॉस कंट्री अंडर १६ हंगेरी येथे निवड झाली. ज्युनिअर हॉकी संघ महाराष्ट्राची संघाची कर्णधार म्हणून कामगिरी बजावली.
या क्रीडा नैपूण्य चाचणीतूनच भंडारा जिल्ह्यातील खेळाडू पुढे आले आहेत. या प्रकल्पाकरिता झटणाऱ्या शिक्षण अ.वा. बुद्धे वर अन्याय कदापी खपवून घेणार नाही, असा गंभीर इशारा १६० पालकांनी निवेदनातून दिला आहे. बुद्धे यांचे वेतन मागील आठ महिन्यापासून बंद आहे. येथे जि.प. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)