नाबार्डच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
By admin | Published: July 13, 2016 01:35 AM2016-07-13T01:35:46+5:302016-07-13T01:35:46+5:30
नाबार्डने भंडारा जिल्ह्यासाठी चार आर्थिक साक्षरता केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना व शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येतो.
नाबार्डचा वर्धापन दिन : सुनील फुंडे यांचे आवाहन
भंडारा : नाबार्डने भंडारा जिल्ह्यासाठी चार आर्थिक साक्षरता केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना व शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येतो. या ठिकाणी चांगल्या मार्गदर्शकांना बोलावून व केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत नाबार्डच्या अनेक योजनांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले.
जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतील आर्थिक साक्षरता केंद्रात नाबार्डचा ३३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, शेतकरी, शेतमजूर, महिला बचतगटांना आर्थिक साक्षरता कळावी, यासाठी नाबार्डची स्थापना करण्यात आली. आर्थिक जागरूकता निर्माण व्हावी, शेतकरी शेतमजूर, बेरोजगार, महिला बचत गटांचा आर्थिक कणा मजबूत व्हावा, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जावे, नाबार्डच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आर्थिक साक्षरता केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले.
ज्या कामासाठी केंद्र देण्यात आले, त्यासाठी या केंद्राचा उपयोग होत नसल्याने संबंधितांच्या अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी कानपिचक्या घेतल्या. कार्यक्रमाला बँकेचे संचालक नरेंद्र बुरडे, सत्यवान हुकरे, योगेश हेडाऊ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे सरव्यवस्थापक बोबडे यांनी केले तर आभार राम आगलावे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)