मनसेचा अधीक्षक अभियंत्यांना घेराव
By admin | Published: June 10, 2017 12:17 AM2017-06-10T00:17:54+5:302017-06-10T00:17:54+5:30
कर्तव्यावर असलेल्या वीज कर्मचारी संध्या खोब्रागडे यांना विजेचा जिवंत विद्युत प्रवाह लागला. यात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले.
महिला वीज कर्मचारी भाजल्याचे प्रकरण : दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कर्तव्यावर असलेल्या वीज कर्मचारी संध्या खोब्रागडे यांना विजेचा जिवंत विद्युत प्रवाह लागला. यात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले. याप्रकरणात दोषी असलेल्या वीज अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारला वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांना घेराव घातला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांच्या नेतृत्वात हा घेराव घालण्यात आला. सुमारे पाऊण तास हा प्रकार चालला. यावेळी अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान मनसेने मडावी यांना आठ दिवसाचा "अल्टीमेटम" दिला असून या दिवसात कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शहारे यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर वीज वितरण कंपनीचे जनित्र आहे. या जनित्रावर ११ केव्हीच्या विद्युत तारा आहे. या तारांमधील एबी स्विचमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने मागील वर्षभरापासून ती सुरू आहे. याची कल्पना नसल्याने तांत्रिक बिघाड दुरूस्ती करण्याकरिता पोलवर चढलेली वीज कर्मचारी संध्या खोब्रागडे हीचा तारांना स्पर्श झाला. त्यांच्यावरील नागपूर येथील उपचारादरम्यान दोन्ही हात व उजव्या पायाचे बोटे निकामी झाल्याने ते कापावे लागल्याचा दुर्दैवी प्रसंग त्यांच्यावर ओढविला आहे. यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हेच कारणीभूत असल्याची चर्चा आता वीज कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
याप्रकरणात कार्यकारी अभियंता हिवरकर, सहायक अभियंता अनंत हेमके, वीज कर्मचारी कृष्णा जिभे व अजय कुंदभरे हे दोषी असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याप्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिभे व कुंदभरे यांना दोषी पकडून केवळ निलंबित केले आहे. मात्र त्यांच्यावर या सर्वांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मनसेने रेटून धरली आहे.
शुक्रवारला अधीक्षक अभियंता मडावी यांना याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घेवून कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी मडावी यांनी दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती व तातडीने कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला.
यावेळी विजय शहारे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष मंगला वाडीभस्मे, शोभा बनकर, विभा साखरकर, नितीन वानखेडे, दिनेश बारापात्रे, चोपराम तिवाडे, महादेव बांते, सोमेश्वर शहारे, आयुश चौधरी, शुभम डहाके, गणेश निपाने, दिनेश भोयर, मिलिंद ठाकरे, मनिष पडोळे, गणेश वानखेडे, ग्यानी घाटोळे, मदन गडरीये, प्रणय ढोमणे आदी मनसैनिक उपस्थित होते.