लॉकडाऊनपासून एसटी बस सुरू झालीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:49+5:302021-07-23T04:21:49+5:30
‘गाव तिथे एसटी’ ब्रीदवाक्यासह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ खेडोपाडी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. याच माध्यमातून ...
‘गाव तिथे एसटी’ ब्रीदवाक्यासह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ खेडोपाडी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. याच माध्यमातून तुमसर आगारामार्फत चालवली जाणारी तुमसर-जांभोरा बसफेरी मागील काही महिन्यांपासून बंद आहे. ही बस फेरी सायंकाळी सातच्या सुमारास तुमसर बसस्थानकातून सुटून करडी-पालोरा मार्गे जांभोरा येथे पोहोचते. या बसचा रात्री निवासी स्वरूपाचा बसथांबा जांभोरा येथे असतो. दुसऱ्या दिवशी ही बस सकाळी सात वाजताच्या सुमारास जांभोरा येथील सुटून तुमसर मार्गाकडे प्रस्थान करते. या बसच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत येणाऱ्या करडी व परिसरातील प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत असते. या सोबतच जांभोरापासून ते तुमसरपर्यंत जाणाऱ्या सर्व लहान-मोठ्या खेड्यांमधील प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होतो.
करडी, माडगी परिसरातील शाळांमधील आठवी ते बारावीचे वर्ग १५ तारखेपासून सुरू करण्यात आले आहेत. अशात विद्यार्थ्यांना ये-जा करण्याकरिता ही या बसची आवश्यकता असते. सोबतच तुमसरपर्यंत जाणाऱ्या विविध कामगारांना या बसचा फायदा होतो. ही बस बंद असल्या पासून पालोरा-करडी-तुमसर मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे. सदर मार्गावर सकाळपासून साडेनऊ वाजेपर्यंत एकही बसफेरी सुरू नाही. सकाळी सात वाजता तुमसरकडे प्रस्थान करणारी जांभोरा-तुमसर बस व आठच्या सुमारास करडीवरून सुटणारी साकोली-तुमसर बसफेरी सुरू करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी, कामगार नागरिकांनी केली आहे.
बॉक्स
अडचणीत सापडलेले प्रवासी
तुमसर-जांभोरा- तुमसर व सकाळी ८ वाजता करडी येथून सुटणारी साकोली-तुमसर ही बस फेरी बंद असल्यामुळे परिसरातील पालोरा, पांजरा, बोरी, करडी, निलज खुर्द, निलज बु., साखर कारखाना, नरसिंह टोला, देव्हाडा बु. व परिसरातील गावांमधून तुमसर येथे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो आहे.