नागपूरसाठी दर तासाला एसटी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:00 AM2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:00:51+5:30
कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान २२ मे पासून जिल्हांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती. पवनी, साकोली आणि तुमसरसाठी दर तासाने एक बस सोडण्यात येत होती. मात्र जिल्हाबाहेर जाण्यासाठी सर्वसामान्यांची मोठी अडचण होत होती. एसटीची चाके ठप्प असल्याने सर्वसामान्यांसमोर मोठा प्रश्न पडला होता. आता शासनाने आंतरजिल्हा वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तब्बल पाच महिन्यांपासून बंद असलेली एसटीची आंतरजिल्हा वाहतूक गुरुवारपासून सुरु होत असून भंडारा येथून नागपूर जाण्यासाठी सकाळी ७ वाजतापासून दर तासाला बस उपलब्ध राहणार आहे. २२ प्रवाशांना प्रवासाची मुभा राहणार असून फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आंतरजिल्हा बससेवा सुरु होत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान २२ मे पासून जिल्हांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती. पवनी, साकोली आणि तुमसरसाठी दर तासाने एक बस सोडण्यात येत होती. मात्र जिल्हाबाहेर जाण्यासाठी सर्वसामान्यांची मोठी अडचण होत होती. एसटीची चाके ठप्प असल्याने सर्वसामान्यांसमोर मोठा प्रश्न पडला होता. आता शासनाने आंतरजिल्हा वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्याबाबतचे पत्र भंडारा राज्य परिवहन महामंडळाला प्राप्त झाले आहे.
गुरुवार पासून भंडारा बसस्थानकावरून आंतरजिल्हा बससेवा सुरु केली जाणार आहे. भंडाराच्या बसस्थानकावरून नागपूरसाठी सकाळी ७ वाजतापासून दर तासाने एक बस सोडण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत बसफेरी सुरु राहील. या बसमध्ये केवळ २२ प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा राहणार आहे. फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून त्या प्रमाणात वाहतूक करण्यात येणार आहे. भंडारा शहरातून नागपूर येथे जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. मात्र बससेवा बंद असल्याने त्यांना खासगी वाहनाने जावे लागत होते. त्यातही ई-पास काढावी लागत होती. या सर्वांना आता विराम मिळणार आहे.
एसटी बसला ई-पासची गरज नाही
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात येत आहे. एसटी महामंडळामार्फत चालविण्यात येणाºया बसेसला ई-पासची आवश्यकता राहणार नाही. प्रवासी प्रतिसाद पाहता त्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी भंडारा आगारप्रमुखांना दिले आहेत.
महामंडळाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आंतरजिल्हा बसफेरी गुरुवारपासून सुरु करण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणेच नियमावली असून प्रवाशांचेही सहकार्य आवश्यक आहे.
-सारिका लिमजे, सहाय्यक वाहतूक अधिकारी, भंडारा आगार.