एसटी बस ४० फूट खोल पुलाखाली उतरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:00 AM2020-03-05T05:00:00+5:302020-03-05T05:00:02+5:30
राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस (एमएच ०६ एच ८१९८) तुमसरहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वरठी येथील रेल्वे पुलावरून बस उतरत असताना अचानक एक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारले आणि बस पुलाजवळील उतारावरून थेट ४० फुट खोल खाईकडे उतरू लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटीबस रेल्वे ओव्हरब्रीज जवळ ४० फुट खोल उतरल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथे घडली. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हा थरार घडला. बसचालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्वच्या सर्व ३९ प्रवासी सुदैवाने बचावले.
राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस (एमएच ०६ एच ८१९८) तुमसरहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वरठी येथील रेल्वे पुलावरून बस उतरत असताना अचानक एक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारले आणि बस पुलाजवळील उतारावरून थेट ४० फुट खोल खाईकडे उतरू लागली. बसमधील सर्व प्रवाशांनी श्वास रोखले, मात्र अशा कठीण प्रसंगातही चालकाने या बसवर नियंत्रण मिळवत सरळ बस खाली उतरविली. यामुळे बसमधील कुणालाही साधे खरचटले नाही, परंतु पाच मिनिटांचा हा थरार प्रवाशांच्या अंगावर काटे आणणारा होता. अपघातातून बचावल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर भीती आणि आनंद दिसत होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात घटनास्थळी दाखल झाले. मार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. दुसºया बसने भंडाराकडे रवाना केले.
चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
तुमसर - नागपूर ही बस चालक संदेश वाहाणे चालवित होते. वरठीचा रेल्वे ओव्हरब्रीज पार करताना अचानक दुचाकीस्वार आडवा आला आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बस पुलाखाली उतरु लागली. समोर खोल दरी दिसत असताना मोठ्या शिताफीने चालक संदेशने बस हाताळली. समयसूचकता वापरून बस सरळ खाली उतरविली. अपघातातून बचावलेल्या प्रत्येक प्रवाशाने चालक संदेशचे मनापासून आभार मानले.
नशीब बलवत्तर म्हणून वाचलो
या बसमध्ये तब्बल ३९ प्रवाशी होते. महिला व लहान मुलांचा सर्वाधिक समावेश होता. तुमसर तालुक्यातील माजी सैनिकाची पत्नी दमयंती तुरकने याही या बसमध्ये प्रवास करीत होत्या. अपघातानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांना अपघाताचा धक्का बसल्याचे जाणवत होते. मात्र एवढ्या मोठ्या अपघातातून आपणच नाही तर सर्वजण वाचल्याचा आनंदही चेहºयावर स्पष्ट दिसत होता. आमचे नशीब बलवत्तर म्हणून वाचलो, असे अनेक प्रवाशांनी सांगितले. या अपघातात कुणाला साधे खरचटलेही नाही.