पुरेसे प्रवासी असतील तरच धावणार बसस्थानकाबाहेर एसटी बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:36 AM2021-04-20T04:36:32+5:302021-04-20T04:36:32+5:30
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाहेरील गावातून ...
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाहेरील गावातून जिल्हा ठिकाणी तसेच विविध कामांसाठी बाहेर फिरणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी असणार आहे. त्यामुळे भंडाऱ्यावरून नागपूर, तुमसर, गोंदिया अशा मार्गांवरील प्रवाशांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाचा तोटाही वाढत चालला आहे. त्यामुळे रिकाम्या बसेस न फिरवता सर्व गोष्टींचा विचार करून एसटी विभागातर्फे नेहमीच्या दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता पुरेसे प्रवासी उपलब्ध झाल्यावरच एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक बसस्थानकात काही निवडक बोटावर मोजण्याइतपतच प्रवासी असल्यास या बसेस धावणार नाहीत. त्यामुळे भंडारा, साकोली, तुमसर, गोंदिया, पवनी अशा महत्त्वाच्या ठिकाणी दिवसभर धावणाऱ्या बसेस आता अत्यावश्यक सेवा निभावणाऱ्या तसेच पुरेसे प्रवासी असल्यासच धावणार आहेत. शासनाच्या सूचनेनुसार एसटी विभागालाही कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के उपस्थितीचे आदेश आहेत. ३० एप्रिलपर्यंत एसटीचे असेच नियोजन राहणार आहे.
बॉक्स
बसेसची केली जाते सॅनिटायझरने फवारणी
एसटी विभागाने वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसचे निर्जंतुकीकरण करूनच बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चालक-वाहकांना व प्रवाशांनाही बसमध्ये प्रवास करताना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच विविध पथकांमार्फत प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईही होणार आहे. चालक, वाहकांनाही लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कोट
शासनाने लागू केलेल्या संचारबंदीने सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मात्र बसेस सोडण्यात येतील. मात्र नेहमीप्रमाणे दैनंदिन धावणाऱ्या एसटी बसेस मात्र आता धावणार नाहीत. -डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा
कोट
भंडारा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे प्रवाशांची संख्या नेहमीच जास्त असते. मात्र संचारबंदीमध्ये सध्या बसस्थानकात प्रवासी येत नाहीत. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्यांसाठी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
फाल्गुन राखडे, भंडारा आगारप्रमुख.