एसटी महामंडळातील चालकांची प्रशिक्षण प्रक्रिया कोरोनामुळे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:41 AM2021-02-17T04:41:56+5:302021-02-17T04:41:56+5:30
भंडारा : प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळातर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची भरती करण्यात येते. दरवर्षीच एसटी महामंडळात ...
भंडारा : प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळातर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची भरती करण्यात येते. दरवर्षीच एसटी महामंडळात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होतात. तेवढेच कर्मचारी नव्याने भरती केले जातात. मात्र, गतवर्षी आलेल्या कोरोना संसर्गामुळे एसटीची चाके पहिल्यांदाच थांबली आणि त्यामुळे भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही थांबले. काही जणांची नियुक्तीही रखडली आहे. परिवहन महामंडळातर्फे २०१९-२० मध्ये चालक कम वाहक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये ४०७ वाहनचालकांची भरती जाहिरात निघाली होती. यामध्ये २३६ जण अंतिम निवड यादीमध्ये पात्र झाले होते. त्यातील २२७ चालक मेडिकल चाचणीस पात्र झाले. त्यातील ७२ जणांची चालक तथा वाहकपदी नेमणूक झाली, तर १०५ चालकांचे अठ्ठेचाळीस दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तर अद्याप ५० वाहनचालकांचे ८० दिवसांचे प्रशिक्षण अद्याप बाकी आहे. मात्र, अद्याप काही जणांना अंतिम वाहन चालन चाचणीचा निकाल लागला नसल्याने नियुक्ती देता आलेली नाही.
एसटीमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती होण्यापूर्वी महामंडळातर्फे वाहन चालन चाचणी पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया कोरोनामुळे थांबविण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा शासनाच्या निर्देशानुसार उर्वरित चालकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. कोरोनाचा संसर्ग वाढताच एसटी महामंडळानेही संपूर्ण वाहतूक बंद केली होती. तसेच कोरोना संसर्गामुळे प्रशिक्षण देणेही बंद करण्यात आले होते. सहा ते सात महिने एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने महामंडळाचे उत्पन्नही बंद झाले होते. त्यामुळे सद्य:स्थितीत डिझेल, कर्मचाऱ्यांचा पगार, कार्यालयीन खर्चासोबतच अनावश्यक होणारा खर्च कसा टाळता येईल या बाबींवर महामंडळाने लक्ष केंद्रित केले असून, नवनवीन उत्पन्नाची साधने वाढविण्याकडे महामंडळ आता प्रयत्न करणार आहे. मात्र, असे असले तरी निवड यादीत नाव आले, मात्र उर्वरित प्रक्रिया कधी पूर्ण होणार, अशी भीती काही प्रशिक्षणार्थी चालकांना सतावत आहे.
बॉक्l
१०५ चालकांचे झाले प्रशिक्षण पूर्ण
महामंडळातर्फे चालक कम वाहक भरती प्रक्रिया जिल्हानिहाय राबविण्यात आली. त्यामध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले होते. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी, कागदपत्रांची तपासणी, शैक्षणिक अर्हता, जात प्रमाणपत्रे यासह अन्य कागदपत्रांची तपासणी करून २३६ वाहन चालकांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली. त्यातील पुढील निवडीची प्रक्रिया पूर्ण करत एकशे पाचजणांचे प्रशिक्षण पूर्णही झाले आहे.
कोट
एसटीचे ४८ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. मात्र, अद्यापही ऐंशी दिवसांचे प्रशिक्षण झालेले नाही. त्यातच लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे प्रशिक्षण थांबले. आता पुढील प्रक्रिया कधी होणार याकडेच माझे लक्ष लागून आहे. कारण मी माझी खासगी नोकरी सोडली आहे.
प्रशिक्षणार्थी, चालक.
कोट
राज्य परिवहन महामंडळाने आमचे प्रशिक्षण कोरोनामुळे थांबविले होते. यावेळी आम्ही घरीच बसून आहोत. मात्र, आता नियम शिथिल होत असल्याने प्रशिक्षणावरील स्थगिती उठवून पुन्हा लवकरच सेवेत रुजू होण्याची संधी मिळेल, अशी आशा मला आहे.
प्रशिक्षणार्थी चालक.
कोट
कोरोनामुळे एसटीच्या फेऱ्या जशा बंद झाल्या, तशा चालक - वाहकांच्या प्रशिक्षणालाही स्थगिती आली होती. मात्र, आता नुकतेच वरिष्ठ कार्यालयाकडून प्रशिक्षणार्थी चालक सेवा, तसेच प्रशिक्षणे पूर्ववत करण्याचे आदेश आल्याने तत्काळ या उमेदवारांना वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रशिक्षण व सेवेत सामावून घेण्यात येईल.
डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी,