एसटीला एकाच दिवशी ४५ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:40 AM2021-08-25T04:40:06+5:302021-08-25T04:40:06+5:30
गत दोन वर्षांपासून एसटी महामंडळाला कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. एसटीचे उत्पन्न कमालीचे घटले. अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगारही थकीत झाला. ...
गत दोन वर्षांपासून एसटी महामंडळाला कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. एसटीचे उत्पन्न कमालीचे घटले. अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगारही थकीत झाला. अशा स्थितीत दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीची चाके धावू लागली, परंतु प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद दिसत नव्हता. मात्र, रक्षाबंधनाच्या पर्वावर एसटीमध्ये मोठी गर्दी झाली. सोमवारी तर सर्व विक्रम मोडीत काढून एसटीला ४५ लाख २१ हजार ८७५ रुपयांचे एकाच दिवशी उत्पन्न झाले. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढे मोठे उत्पन्न मिळाले.
एसटी महामंडळाने सोमवारी ३३९ बसेसद्वारे एक लाख १९ हजार ४५ किमीच्या फेऱ्या केल्या. त्यात ८८ हजार ३३२ प्रवाशांनी प्रवास केला. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. प्रवाशांची प्रथम पसंती एसटीलाच असते, परंतु कोरोना संसर्गामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीती होती. आता ही भीतीही कमी झाल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स
भारमानात राज्यात तिसरा क्रमांक
भंडारा विभागातील सात आगाराने रक्षाबंधनाच्या पर्वात सोमवारी विक्रमी उत्पन्न घेतले. भंडारा विभाग प्रति किलोमीटर उत्पन्न आणि भारमानात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. एसटीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व खबरदारी घेतली आहे. कोरोना संसर्ग होऊ नये, म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे, असे विभागीय वाहतूक अधिकारी डॉ.चंद्रकांत वडस्कर यांनी सांगितले.
कोट
प्रवाशांनी न घाबरता एसटीने प्रवास करावा. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी एसटी महामंडळातील वाहकापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी प्रयत्न केले. त्याचे हे फलित होय.
- विनय गव्हाळे, विभागीय नियंत्रक भंडारा.