मुक्कामी बसेसचे एसटीचे कर्मचारी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:31 AM2021-04-05T04:31:18+5:302021-04-05T04:31:18+5:30
भंडारा : एसटी महामंडळातर्फे गाव तेथे एसटी पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गावातील प्रवाशांची सोय व्हावी, ...
भंडारा : एसटी महामंडळातर्फे गाव तेथे एसटी पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गावातील प्रवाशांची सोय व्हावी, प्रवाशांना रात्री उशिरा का असेना पण आपल्या घरी पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळातर्फे जिल्ह्यातील ११० ठिकाणी मुक्कामी बस फेऱ्या होत आहेत. यातील ७९ ठिकाणी चालक-वाहकांना एसटी महामंडळाचा हक्काचा निवारा उपलब्ध आहे. मात्र, ३१ ठिकाणी चालक-वाहकांना झोपण्यासाठी कुठे मंदिराचा, तर कुठे एसटी बसेसचा आधार घ्यावा लागत आहे. कोरोनाने संपूर्ण जगच बदलून गेले आहे. कोरोनाआधी गावातील माणसे चालक, वाहक यांना साहेब म्हणून आदराने पाहुणचार करायची, मात्र आज कोरोनानंतर ही परिस्थिती बदलली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत आहेत.
अनेक प्रवाशांशी एसटी कर्मचाऱ्यांचा संपर्क येत असल्याने कोरोनाची भीती गावकऱ्यांमध्ये असते. त्यामुळे ग्रामपंचायत, तसेच जिल्हा परिषद शाळा अशा ठिकाणी चालक, वाहक यांच्या झोपण्याची व्यवस्था होत नाही. मात्र, असे असले तरीही अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचाही अनुभव येत आहे. तालुक्यातील कांद्री येथे एसटीतच झोपावे लागत आहे, तर मुंढरी येथे चालक, वाहकांना मंदिरात झाेपावे लागते.