महिलांच्या रात्रीच्या प्रवासाला एसटीची सुरक्षा; बसमधील दिवे सुरुच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 02:08 PM2021-10-01T14:08:00+5:302021-10-01T14:10:23+5:30
आता रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांनी वाहकाला विनंती केल्यास त्या बसमधील दिवे सुरूच राहणार आहेत. याबाबत भंडारा विभागातील सर्व आगार प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने याबाबत पत्र काढले आहे.
भंडारा : राज्यभरात सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतीच रायगड जिल्ह्यात १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळेच एसटी महामंडळानेही रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेकदा एसटी बसमधून प्रवास करताना रात्रीच्या वेळी काही दुष्ट प्रवृत्तीचे पुरुष महिलांशी लगट करण्याचा प्रयत्न करतात. काहीजण विनाकारण जवळीक साधत, विनाकारण धक्काबुक्की करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवासात महिलांना असुरक्षित वाटू नये यासाठी एसटी महामंडळाने महिलांनी विनंती केल्यास त्या बसमधील दिवे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बस चालकाला डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून चालकाकडून अनेकदा बसमधील लाइट बंद केले जातात. मात्र, आता महिलांनी विनंती केल्यास बसमधील लाइट सुरूच ठेवावे लागणार आहेत. एखाद्या वाहकाने विरोध केल्यास त्याबाबत महिलांना थेट आगार प्रमुखांकडे तक्रारही करता येणार आहे.
महिलांना कंडक्टरला विनंती करावी लागणार
रात्रीच्या वेळी एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना काही वेळा वाईट अनुभव आले आहेत. अनेकदा रातरानीने प्रवास करताना काही महिलांसोबत अनुचित प्रकार घडल्याची काही उदाहरणे घडली आहेत. मात्र, आता या गोष्टींवर आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने महिलांसाठी रात्रीच्या प्रवासादरम्यान महिलांनी विनंती केल्यास एसटीतील लाइट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. आता वाहकांनाही या सूचनांचे पालन करण्याची सक्ती आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाने घेतलेला निर्णय चांगला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासह स्त्रियांच्या सुरक्षेसाठी त्या काळातही प्राधान्य दिले होते. यासोबतच चुकीच्या प्रवृत्तींचा त्यांनी वेळीच नायनाट केला. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा चांगलाच असला पाहिजे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढारलेल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.
रजनी वैद्य, सामाजिक कार्यकर्त्या, भंडारा
आजही एसटीचा प्रवास हाच सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र, रात्रीच्या वेळी घरातील कोणीही नसताना एकट्या महिलेने रात्री प्रवास करताना असुरक्षितता जाणवते. त्यामुळे एसटीच्या निर्णयाचे महिलांकडून स्वागतच आहे. महिलांनी वाहकाकडे लाइट सुरू ठेवण्याची विनंती करावी.
प्रीती गोसेवाडे, सामाजिक कार्यकर्त्या, भंडारा
रात्रीच्या प्रवासावेळी महिलांनी बसमध्ये लाइट सुरू ठेवण्यासंबंधी विनंती केल्यास लाइट सुरू ठेवण्यासंबंधी सर्व आगार प्रमुखांमार्फत वाहकांना सूचना दिल्या आहेत. एसटी महामंडळाने महिलांच्या सुरक्षेसाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा