एस.टी. वाहकावर होणार फौजदारी गुन्ह्याची नोंद
By admin | Published: May 24, 2015 01:20 AM2015-05-24T01:20:45+5:302015-05-24T01:20:45+5:30
बसफेरी दरम्यान मार्ग तपासणी पथकाला वाहकांकडून काही आर्थिक गैरप्रकार झाल्याने दिसून आल्यास संबंधित वाहकाविरूद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा,..
भंडारा : बसफेरी दरम्यान मार्ग तपासणी पथकाला वाहकांकडून काही आर्थिक गैरप्रकार झाल्याने दिसून आल्यास संबंधित वाहकाविरूद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी, मुंबई यांनी काढले आहे.
२० मे २०१५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश परिपत्रकाद्वारे धडकले आहेत. मात्र या जाचक अशा परिपत्रकामुळे वाहक वर्गात संताप व असंतोषाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय एस.टी. कामगार काँग्रेसने या वाहक विरोधी परिपत्रकाचा निषेध नोंदविला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना संघटनेने आपल्या पत्रकात नमूद केले की, वाहकांचा प्रवासासोबत तिकीट दर, हेतुपुरस्सरपणे तिकीट न काढता प्रवास करणे, चिल्लर पैशाची देवाण घेवाण, विद्यार्थी सवलत व अन्या सवलतीच्या नावावर खोटे प्रवाशी आढळल्यास, मशीनमधून तिकीट उशीरा निघणे आदी सर्व कारणांमुळे वाद निर्माण होण्याचे प्रकार बरेचदा घडत असतात. अशा प्रत्येक प्रकरणात वाहकाला दोषी मानल्या जाते. परंतु बऱ्याचदा खोटे बनाव रचून हेतुपुरस्सररित्या वाहकाला यात गोवण्यात येते. वाहकाने सत्य परिस्थिती सांगितल्यावरही तपासणी अधिकारी सहकार्य न केल्याचा ठपका ठेवत कारवाईसाठी दबाव आणून सोयीनुसार बयान लिहून घेण्याचे प्रकार घडत आहेत. एक-दोन विना तिकीट प्रवाशांसाठी वाहकाला महामंडळाच्या सेवेतून बडतर्फ करण्याची पद्धत महामंडळात प्रचलीत आहेत. परंतु या सर्व प्रकारामुळे त्या वाहकांच्या भविष्याची व कुटूंबाची वाताहत होते. याबाबत बऱ्याचवेळा कामगार संघटनेने या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु अधिकाऱ्यांनी कामगार संघटनेच्या वाहकांबद्दल दूषित दुराग्रह ठेवून वाहकांना महामंडळाच्या सेवेतून बडतर्फ करण्याचा सपाटा लावून मुस्कटदाबी चाललेली आहे.
वाहक आधिच प्रचंड दहशतीखाली काम करीत आहे. आता त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश देणारे अन्यायकारक परिपत्र काढण्यात आले. त्यामुळे वाहक वर्गात कमालीचा रोष व संतापाचे वातावरण आहे. के काळे परिपत्रक रद्द करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एस.टी. कामगार काँग्रेस संघटनेचे विभागीय सचिव भगिरथ धोटे यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)