संकटावर मात करून ठाम उभे रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:31 PM2017-08-21T22:31:26+5:302017-08-21T22:31:44+5:30
जगात अशी अनेक माणसं आहेत, जी कर्तबगार आहेत पण अयशस्वी आहेत. संपूर्ण समाधानी व सुखी माणूस जगात शोधूनही सापडणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जगात अशी अनेक माणसं आहेत, जी कर्तबगार आहेत पण अयशस्वी आहेत. संपूर्ण समाधानी व सुखी माणूस जगात शोधूनही सापडणार नाही. अशा परिस्थितीत आपण अपराधी आहोत ही भावना मनात घर करुन न ठेवता आपण काहीतरी करु शकतो, ही जिद्द बाळगून येणाºया संकटावर मात करीत स्वत:ला घडवा. बंदिवानांना प्रशिक्षण हा अतिशय अभिनव उपक्रम असून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपला व्यवसाय निश्चित सुरु करा. संकट येतील, त्रास होईल पण थोर पुरुषांचा आदर्श समोर ठेवून न डगमगता समाजात भक्कमपणे उभे रहा, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा कारागृह व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कैद्यांसाठी ८ ते १८ आॅगस्ट या दरम्यान विशेष व्यवसाय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कारागृहात करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा समारोप सोमवार रोजी झाला, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कारागृह अधिक्षक अ.म. कुमरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एस. खांडेकर, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक संदिप देवगीरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एन. वाय. सोनकुसरे, महिला व बालविकास अधिकारी आंबेडोरे, प्रशिक्षक शिरीष निर्वाण उपस्थित होते.
यामध्ये अगरबती तयार करणे, मेनबत्ती तयार करणे, खडू तयार करणे, कापूर तयार करणे असे अनेक उद्योग प्रशिक्षणाचा यात समावेश होता. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तु बाहेर विकल्या जातील व त्यातून त्यांना रोजगार मिळेल. या चांगल्या संधीचा फायदा घ्या व दुसºयांना शिकवा, असे मार्गदर्शनपर सूचना त्यांनी दिल्या. कारागृहातील बंदिवानांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याची प्रशासनाची कल्पना अभिनंदनीय असल्याचे सांगून देशमुख म्हणाले की, या प्रशिक्षणामुळे बंदिवानामधील माणूस घडविण्याचे काम केले आहे. सोबतच सुंदर पुनर्वसन या निमित्ताने होणार आहे. कारागृहात बंदिस्त बंदिवानांमध्ये सुध्दा चांगले व्यक्ती असून गुणवंत सुध्दा आहेत. या गुणवंतांना आकार देण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वपूर्ण ठरणार आहे, असे ते म्हणाले. या ठिकाणाहून बाहेर पडल्यानंतर घेतलेल्या प्रशिक्षणाचा योग्य वापर करुन आपले जीवन समृध्द बनवा, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी प्रशिक्षण पूर्ण करणाºया २७ बंदिवानांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या अगरबत्तींचे प्रदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी आर.एम. खांडेकर, रवी गिते, संदिप देवगिरकर, शिरीष निर्वाण यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे संचालन स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एन. वाय. सोनकुसरे यांनी केले तर आभार अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एस. खांडेकर यांनी मानले. या प्रशिक्षणास कारागृहातील ५०० च्यावर कैदी उपस्थित होते. कारागृहात बंदिवानांना प्रशिक्षण देण्याचा हा पहिलाच उपक्रम असून यामुळे कौशल्य विकासातून अर्थ प्राप्ती हा उद्देश सार्थ ठरणार आहे.
कारागृहात कौशल्य विकास प्रशिक्षण हा आपल्यासाठी सुखद अनुभव असून या पूर्वी असा उपक्रम राबविल्याचे ऐकले नव्हते. अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण हा आपल्या आयुष्याला चांगले वळण देणारा क्षण आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर या प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होईल.
-रत्नाकर नंदनवार, बंदिवान
कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे जीवनात चांगली संधी प्राप्त झाली आहे. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेली ही संधी आपल्याला निश्चितच उपयोगी पडणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ मला उर्वरित आयुष्यात निश्चितच होईल.
-वामन हटवार, बंदिवान