तीन सभापतींच्या अनुपस्थितीत स्थायी समिती सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:12 PM2017-10-23T23:12:50+5:302017-10-23T23:13:01+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचार संहितेनंतर जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा आज घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचार संहितेनंतर जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा आज घेण्यात आली. या सभेला तीन सभापतींची गैरहजेरी होती. त्यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या सभेत साधकबाधक चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने शौचालयाच्या बांधकामाचा निधी यावर उपस्थित समिती सदस्यांनी अधिकाºयांना विचारणा केली.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे व बांधकाम सभापती विनायक बुरडे या तीन महत्वाच्या विभाग सभापतींची स्थायी समितीच्या सभेला अनुपस्थिती होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर या होत्या. या सभेला समाजकल्याण सभापती निलकंठ टेकाम हे पुर्णवेळ उपस्थित होते. तर महिला व बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले यांनी सभेला शेवटीशेवटी उपस्थिती लावली.
सभेला पदसिद्ध सचिव उप मुख्य कार्यकारी अधिकारी मुंजषा ठवकर, स्थायी समिती सदस्य धनेंद्र तुरकर, होमराज कागपते, सरिता चौरागडे, संदिप टाले, प्यारेलाल वाघमारे, मनोहर राऊ त, सुभाष आजबले यांच्यासह सर्व विभागप्रमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तीन सभापतीपैकी उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांची प्रकृती बरी नसल्याने ते वैद्यकीय उपचारासाठी नागपूरला गेले असल्याचे समजले. मात्र अन्य दोन सभापतींच्या अनुपस्थितीबाबत कळू शकले नाही.
स्थायी समितीची सभा असल्याने अनेक अधिकाºयांना निरुत्साही होवून हजेरी लावावे लागल्याचे त्यांच्या उपस्थिती दरम्यान जाणवले. सभेदरम्यान धनेंद्र तुरकर यांनी अनेक गावामधील आठवडी बाजारात होणाºया अतिक्रमणाबाबत मुद्दा उपस्थित केला. सोबतच ज्याकडे शौचालय नव्हते अशांनी शौचालयाचे बांधकाम केले आहे. मात्र त्यांना अद्यापही बांधकामाचा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सर्व शौचालय लाभार्थ्यांना तातडीने निधी द्यावा अशी मागणी तुरकर यांनी केली. या सभेत अन्य काही सभासदांनीही क्षेत्रांतर्गत खोळंबलेल्या विकास कामाबाबतही यावेळी चर्चा केली. बुधवारला विशेष सर्वसाधारण सभा बोलविली असल्याने आजच्या सभेला महत्व आले होते, मात्र सभापींच्या गैरहजेरीने अनेकांनी नाराजगी व्यक्त केली.