स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले

By admin | Published: January 14, 2017 12:24 AM2017-01-14T00:24:24+5:302017-01-14T00:24:24+5:30

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातील भिंतीवरून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवाजी महाराज यांचे छायाचित्र काढण्यात आल्याने ...

The Standing Committee meeting held on to the officials | स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले

स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले

Next

वादळी सभा : शिवरायांचे छायाचित्र, लघु पाटबंधारे विभागाच्या प्रभाराचे प्रकरण गाजले
भंडारा : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातील भिंतीवरून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवाजी महाराज यांचे छायाचित्र काढण्यात आल्याने शिवसैनिकांनी गुरूवारला जिल्हा परिषदेत राडा घातला. हा मुद्दा शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत कृषी सभापती नरेश डहारे यांनी सुरूवातीला लावून धरत दोषींविरूद्ध कारवाईची मागणी केली. यासोबत लघु पाटबंधारे विभागाचा प्रभार देण्यावरून पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, अशा एकाहून एक विषयांवर आजची स्थायी समितीची सभा चांगलीच वादळी ठरली.
जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेत समितीचे पदसिद्ध सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, कृषी सभापती नरेश डहारे, समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम, अर्थ व बांधकाम सभापती विनायक बुरडे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, समिती सदस्य धनेंद्र तुरकर, संदीप टाले, सरिता चौरागडे, होमराज कापगते, प्यारेलाल वाघमारे, मनोहर राऊत, रमेश डोंगरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व सर्व खंडविकास अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीला कृषी सभापती डहारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या कक्षातील शिवाजी महाराजांचे छायाचित्र काढल्यामुळे शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेत गदारोळ केला. याला अधिकारी दोषी असल्याचा आरोप केला. शिवाजी महाराज हिंदूंचे आराध्यदैवत असून त्यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा निर्वाणीचा ईशारा सभागृहात दिला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. परंतु डहारे यांनी अधिकाऱ्यांची मुजोरी सहन करणार नसल्याचे खडसावून सांगितले. सभापती शुभांगी रहांगडाले यांनीही वाळके यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
यावर वाळके यांनी, माझी यात चुक नाही, कुणाच्या कक्षात काय चालते, हे मी बघत नाही. प्रत्येक प्रकरणात माझ्यावरच खापर फोडले जाणे, हे बरोबर नाही. मी सामान्य झालो आहे, असे उद्विग्न उद्गार वाळके यांनी काढून या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
यावर शुभांगी रहांगडाले यांनी, सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी तुमच्याकडे असल्यामुळे हा विषय तुमच्याशी निगडीत असल्याचे सांगून वाळके यांना धारेवर धरले.(शहर प्रतिनिधी)



गुप्तांकडे प्रभार देण्याचा ठराव
लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एस. पराते हे रजेवर गेले आहेत. त्यांचा प्रभार उपविभागीय अभियंता आर.एच. गुप्ता यांना देण्याच्या सुचना पदाधिकाऱ्यांनी सीईओंना दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाचे अभियंता शेळके यांच्याकडे प्रभार सोपविला होता. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी सभागृहात येण्यापूर्वी शेळके यांना संबंधीत विभागाच्या कामांचा अभ्यास करून या, असे खडेबोल सुनावले. मार्च महिन्यात देयकांचे कमिशन घेण्यासाठी येणाऱ्या पराते यांना परत पाठविण्याचा ठराव पारीत करावा, अशी मागणी सदस्य संदीप टाले यांनी केली. यावेळी लघु पाटबंधारे विभागाचा प्रभार उपविभागीय अभियंता आर.एच.गुप्ता यांच्याकडे देण्याचा ठराव घेण्यात आला.

उपाध्यक्ष, सीईओंची अनुपस्थिती
स्थायी समितीच्या सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे हे उपस्थित नव्हते. डोंगरे हे नागपूरला न्यायालयीन कामांसाठी तर अहिरे हे आयएएसच्या प्रशिक्षणासाठी गेल्याचे सांगण्यात आले. गुरूवारला शिवाजी महाराजांच्या फोटोवरून झालेल्या वादामुळे आजची सभा महत्त्वपूर्ण होती. या सभेला ते उपस्थित नसल्यामुळे चर्चेला वाव मिळाला. याशिवाय शिक्षण विभागातील महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. परंतु शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी २.३० वाजेपर्यंत उपस्थित झाले नाही. जे उपस्थित होते त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

Web Title: The Standing Committee meeting held on to the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.